वेगवान १२.५ टक्क्यांनी विकास

भारताच्या अर्थवृद्धीविषयी ‘आयएमएफ’चे गुलाबी अनुमान

0

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने मंगळवारी विद्यमान २०२१ सालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासाचे म्हणजे १२.५ टक्के दराने वाढीचे आशावादी अनुमान मंगळवारी व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे करोना महामारीच्या सावटात सर्व प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था ढासळल्या असताना, एकमेव सकारात्मक वाढ नोंदवणाऱ्या चीनलाही भारताकडून यंदा मात दिली जाण्याचे अंदाजण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने व्यक्त केलेल्या भारताविषयीच्या अंदाजाला साशंकतेचा पदर होता. करोना रुग्णवाढीचा भयंकर वेग आणि कैक भागात पुन्हा सुरू झालेल्या टाळेबंदीचा परिणाम पाहता, किमान ६.९ टक्के ते कमाल १२.५ टक्के अशा तिच्या अनुमानाची खूपच रूंद खिडकी ठेवत तिने भारताच्या आर्थिक भविष्याविषयी सावधपणे भाकीत केले होते. मात्र जागतिक बँकेसोबत होत असलेल्या वार्षिक बैठकीत, आयएमएफने अधिक स्पष्ट पवित्रा घेत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या २०२१ सालात प्रभावी कामगिरीचे भाकीत केले आहे.

‘आयएमएफ’च्या मते, २०२१ सालात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा (जीडीपी) दर १२.५ टक्के, चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर ८.६ टक्के असू शकेल. आधीच वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचे उणे ८ टक्क््यांनी अधोगती झाली होती, तर चीनने सकारात्मक २.३ टक्क््यांची वाढ दाखविली होती.

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी स्पष्ट केले की, ‘जागतिक अर्थव्यवस्थेबाबत २०२१ आणि २०२२ साल हे प्रभावीपणे उभारीची असतील. यापूर्वीच्या अनुमानापेक्षा जागतिक अर्थव्यवस्थेचे ताजे अंदाज चांगलीच सुधारणा दर्शविणारे असून, २०२१ साठी ६ टक्क््यांच्या वाढीचे आणि २०२२ साठी ४.४ टक्क््यांच्या वाढीचे अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. २०२० सालात जागतिक अर्थव्यवस्थेची उणे ३.३ टक्के अशी कामगिरी होती.

…तर ‘जीडीपी’चे  २ टक्क्यांनी नुकसान

भारताची अर्थव्यवस्था सावरून, नव्या दमाने उभारी घेत असल्याचे वेगवेगळ्या आकडेवारी संकेत देत असल्या तरी, ही फेरउभारी नाजूक वळणावर असून, दैनंदिन करोना रुग्णसंख्येतील ताजी विक्रमी वाढ पाहता, राष्ट्रीय स्तरावर पुन्हा महिनाभराची टाळेबंदी लागू केल्यास, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांत अर्थात जीडीपीला दोन टक्क््यांचे नुकसान सोसावे लागू शकते, असे अमेरिकी दलाली पेढीने इशारा दिला आहे.

देशातील दैनंदिन करोना रुग्णवाढीने सोमवारी पहिल्यांदाच एक लाखांचा आकडा गाठला आणि महाराष्ट्रासह काही राज्यांना स्थानिक स्तरावर टाळेबंदी व तत्सम निर्बंध लागू केले आहेत, याकडे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने लक्ष वेधले आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून देशस्तरावर टाळेबंदीला आजमावण्याचे ठरविले गेले आणि महिनाभराच्या कालावधीसाठी ती लांबली तर तिचे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून येतील, असे तिने संकेत दिले आहेत.

त्यामुळे देशी-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांकडून २०२१-२२ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत दोन अंकी दराने वाढीच्या आशादायी अंदाजांवर पाणी फेरले जाईल, असे या दलाली पेढीने भीती व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.