पालघर : चूक दुरुस्तीनंतर करोना रुग्णवाढीचा दर १३ वरून ९.९ टक्क्यांवर

२४ जून रोजी संपलेल्या आठवडय़ादरम्यान (शुक्रवार ते गुरुवार) जिल्ह्यचा रुग्णवाढ दर ७.४ इतका नोंदवण्यात आला होता.

0 0

पालघर : करोना संक्रमणाचा आठवडा दरवाढीचा दर निश्चित करताना पुणे येथील कार्यालयात पालघर जिल्ह्यतील आकडेवारी नोंदवताना काही तांत्रिक चुका झाल्याने जिल्ह्यचा दर अचानक १३ टक्क्यांच्या जवळपास पोचला होता.  चूक दुरुस्त केल्यानंतर  रुग्णवाढीचा दर  ९.९ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा तिसऱ्या स्तरावर कायम असून व्यावसायिकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यची आठवडा रुग्ण दरवाढ दर १३ टक्क्यांच्या जवळपास राहिला होता व त्यामुळे पालघर जिल्हा करोना र्निबधाच्या चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होऊन जिल्ह्यत कडक निर्बंध लादले जातील अशी भीती वर्तवण्यात येऊ लागली होती.

अचानक वाढलेल्या रुग्णवाढ दरची जिल्हा आरोग्य विभागाने पडताळणी केली असता पुणे येथील करोना रुग्ण माहिती संकलन केंद्रात इतर जिल्ह्यतील काही दिवसांची माहिती पालघर जिल्ह्यच्या आकडेवारीमध्ये समाविष्ट झाल्याचे दिसून आले. ही बाब माहिती संकलन केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्ह्यतील आठवडा रुग्ण वाढीचा टक्का घसरला. सध्या पालघर जिल्हा दहा टक्क्यांच्या उंबरठय़ावर असून दहा टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी गेल्यास जिल्ह्यला चौथ्या स्तरात वर्ग होईल.

२४ जून रोजी संपलेल्या आठवडय़ादरम्यान  (शुक्रवार ते गुरुवार) जिल्ह्यचा रुग्णवाढ दर  ७.४ इतका नोंदवण्यात आला होता. या दरनिश्चित पद्धतीमध्ये आरटीपीसीआर तसेच प्रतिजन चाचणी यांच्या संख्येचा एकत्रित समावेश होता. मात्र राज्य शासनाने निकषांमध्ये बदल करून आठवडा रुग्णवाढ दर निश्चित करण्यास फक्त आरटीपीसीआर चाचणी संख्या विचाराधीन घेण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यतील रुग्णवाढ दर अचानक वाढला आहे. जिल्ह्यतील आरोग्य केंद्रांमध्ये आरटीपीसीआर तपासणी वाढवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे. तर करोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची प्रतिजन चाचणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

वसई विरारला ही दिलासा.

वसई विरार शहराचा सकारात्मक दर जरी कमी असला तरी जिल्ह्यचा सकारात्मक वाढत असल्याने वसई—विरार चौथ्या स्तरात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे शहरात पुन्हा चौथ्या स्तरातील निर्बंध लागू होतील. यामुळे दुकानदार, व्यावसायिक यासह इतर नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. कारण वसई विरार मध्ये २२ ते २८ जून या आठवडाभराच्या कालावधी दरम्यान २६ हजार २१२ इतक्या चाचण्या केल्या होत्या यात ७७७ इतके रुग्ण सकारात्मक असल्याने शहराचा सरासरी लागण दर हा २.९६ टक्के इतका आहे.  मात्र जिल्ह्यचा दर वाढत असल्याने जिल्हा चौथ्या स्तरात जाऊन याचा फटका वसई विरारला बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आठवडय़ा अखेर जिल्ह्यचा सकारात्मक लागण दर हा ९.९ टक्कय़ांवर आल्याने दिलासा मिळाला आहे.

आभासी रुग्ण वाढ

जिल्ह्यतील काही खासगी रुग्णालयांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या प्रतिजन चाचणी अहवालात  संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती करोना पोर्टलवर अपलोड केली नव्हती. राज्य शासनाने हा अनुशेष तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ही माहिती गेल्या काही आठवडय़ांत संकलित केली जात आहे. जिल्ह्यत प्रत्यक्षात रुग्णसंख्या कमी प्रमाणात असताना ही आभासी रुग्णवाढ दिसून येत होती. या सर्व बाबींचा फटका जिल्ह्यचा करोना आठवडा रुग्णवाढ दरावर व परिणामी निर्बंध स्तरावर दरावर झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांतील जुनी माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया जवळपास संपली असून त्याचा यापुढे त्याचा जिल्ह्यच्या आकडेवारीवर विशेष परिणाम होणार नाही असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.