विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारतीय महिला त्रिकुटाची सुवर्णकमाई
कैरो (इजिप्त) : राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले. रविवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताच्या त्रिकुटाने सिंगापूरवर १७-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या लढतीच्या पहिल्या टप्प्यात भारताने १५ पैकी सहा वेळा अचूक वेध साधताना २-० […]
कैरो (इजिप्त) : राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले.
रविवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताच्या त्रिकुटाने सिंगापूरवर १७-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या लढतीच्या पहिल्या टप्प्यात भारताने १५ पैकी सहा वेळा अचूक वेध साधताना २-० अशी आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर सिंगापूरने पुनरागमन केल्याने तिसऱ्या टप्प्याअंती दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी होती. मग राहीने आपला अनुभव पणाला लावताना पाचव्या टप्प्यात पाच वेळा अचूक वेध साधल्याने भारताला ७-३ अशी आघाडी मिळाली. परंतु सिंगापूरने पुन्हा खेळ उंचावल्याने लढतीत पुढे ९-९ आणि १३-१३ अशी बरोबरी झाली. यानंतर मात्र सिंगापूरच्या त्रिकुटाने चूका केल्या आणि भारताने सातत्य राखत विजय मिळवला. भारत एकूण पाच पदकांसह आता पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीयंका-अखिलला कांस्य
भारताच्या श्रीयंका सदांगी आणि अखिल शेरॉन या जोडीने ५० मीटर रायफल थ्री-पोजिशन मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत श्रीयंका-अखिल जोडीने ऑस्ट्रियाच्या रेबेका कोएक आणि ग्रेनॉट रमप्लेर जोडीवर मोठय़ा फरकाने मात केली.