‘आयपीएल’ : १४वे पर्व

आज होणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी गाठ

0

एकीकडे करोना संसर्गाच्या साथीने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना शुक्रवारपासून भारतामध्ये क्रिकेटच्या रूपात इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) दुसरी लाट येणार आहे. करोनाच्या कहरामुळे गेल्या वर्षभरापासून मानसिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण झालेल्या क्रिकेटप्रेमींचे पुढील दोन महिने पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी ‘आयपीएल’ सज्ज असून १४व्या हंगामातील पहिल्या लढतीत गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

गतवर्षी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एप्रिल-मे महिन्याऐवजी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे १३व्या हंगामाचे आयोजन केले. या हंगामाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता मात्र ही स्पर्धा पुन्हा मायदेशी परतली आहे. यंदाही करोनाचे सावट कायम असले, तरी सर्व नियमांचे पालन करून जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रथमच विजयी सलामी नोंदवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. तर दुसरीकडे चेपॉकवरील खराब कामगिरीला पुसून टाकण्याचे ध्येय विराट कोहलीच्या बेंगळूरुचे असेल. यंदा कोणत्याही संघाला आपल्याच मैदानावर सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याशिवाय नियमांचे पालन करतानाच आता कर्णधारांना ९० मिनिटांत २० षटके पूर्ण करण्याचे आव्हानही पेलावे लागणार असल्याने एकंदर ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संघ

* मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स नीशाम, नॅथन कोल्टर-नाइल, पीयूष चावला, सौरभ तिवारी, अर्जुन तेंडुलकर, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, मोहसिन खान, युधविर चरक, मार्को जान्सेन.

* रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मोहम्मद अझरुद्दीन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, फिन अ‍ॅलेन, कायले जेमिसन, डॅनिएल ख्रिस्तियन, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, अ‍ॅडम झम्पा, यजुर्वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, के. एस. भरत, सचिन बेबी, पवन देशपांडे, हर्षल पटेल, रजत पटिदार, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद.

युवा-अनुभवी फलंदाजांची मुंबईकडे फौज

पाच वेळा ‘आयपीएल’ जिंकणारा मुंबईचा संघ यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित, क्विंटन डीकॉक, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड या अनुभवी फलंदाजांसह काही आठवड्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सूर्यकुमार यादव, इशान किशन मुंबईची खरी ताकद आहेत. डीकॉक विलगीकरणामुळे पहिल्या लढतीला मुकण्याची शक्यता असली त्याच्याऐवजी ख्रिस लीनसारख्या धडाकेबाज फलंदाजाचा पर्याय मुंबईकडे उपलब्ध आहे.

बोल्ट-बुमरापासून सावधान

जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान जोडीपासून प्रतिस्पर्धी संघांना नेहमीच सावध राहावे लागते. गतवर्षी या जोडीने एकूण ५२ बळी (बुमरा २७, बोल्ट २५) मिळवून मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. परंतु चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक असल्यामुळे राहुल चहर आणि पीयूष चावला यांची जोडीही मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. रोहितनेसुद्धा चावलाच्या समावेशामुळे संघाची चिंता कमी झाल्याचे सांगितले. त्याशिवाय युवा खेळाडूंना दिशा दाखवण्यासाठी ओळखला जाणारा मुंबईचा संघ पहिल्याच लढतीत प्रतिभावान डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

बेंगळूरुचे नव्याने संघबांधणीचे लक्ष्य

कर्णधार कोहलीसह, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल अशा एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा समावेश असलेला बेंगळूरुचा संघ या वेळी नव्याने संघबांधणी करण्यावर भर देईल. विशेषत: गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना एकही षटकार लगावू न शकलेल्या मॅक्सवेलवर बेंगळूरुसाठी खेळताना कामगिरी उंचावण्याचे दडपण असेल. देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद अझरुद्दीन हे स्थानिक फलंदाज छाप पाडण्यासाठी उत्सुक आहेत. कोहली स्वत: सलामीला येण्याची शक्यता असल्याने त्याच्या साथीला न्यूझीलंडचा फिन अ‍ॅलेन किंवा नुकताच करोनातून सावरलेला पडिक्कल यांपैकी एकाला संधी मिळेल.

गोलंदाजांकडून सुधारणेची आशा

गोलंदाजी विभागात नेहमीच सुमार कामगिरी केल्यामुळे बेंगळूरुला अद्याप एकदाही या स्पर्धेचे जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा मात्र मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुचे गोलंदाज कामगिरी उंचावतील, अशी आशा आहे. लिलावात १५ कोटींची बोली लागलेला कायले जेमिसन, केन रिचर्डसन, नवदीप सैनी अशी वेगवान फळी बेंगळूरुकडे उपलब्ध असून अ‍ॅडम झम्पाच्या अनुपस्थितीत फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर मुंबईसाठी घातक ठरू शकतात.

१७-१० मुंबई आणि बेंगळूरु ‘आयपीएल’मध्ये २७ वेळा आमनेसामने आले असून यांपैकी मुंबईने १७, तर बेंगळूरुने १० लढती जिंकल्या आहेत.

१२२  विराट कोहलीला ‘आयपीएल’मध्ये ६,००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरण्यासाठी १२२ धावांची गरज आहे.आता त्याच्या नावावर ५८७८ धावा जमा आहेत.

श्रेयसच्या खांद्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्यावर गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला दुखापत झाली. त्यामुळे संपूर्ण ‘आयपीएल’लाही त्याला मुकावे लागणार आहे. श्रेयसच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत यंदा दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. ‘‘माझ्या खांद्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून लवकरच मैदानात परतण्यासाठी मी आतुर आहे. सर्व शुभचिंतकांचे आभार,’’ असे ‘ट्वीट’ श्रेयसने केले.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Leave A Reply

Your email address will not be published.