IPL 2021: पुन्हा एकदा सुरु होणार आयपीएल?; बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र

करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न

0 49

करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरु आहेत. करोना संकटामुळे अर्ध्यातच आयपीएल स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढवली होती. परिस्थितीनुसार आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिलं असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवला जावी अशी विनंती केली आहे.

बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला लिहिलेल्या पत्रात भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडा आधी खेळवली जावी अशी विनंती केली आहे. नियोजित वेळेनुसार, ४ ऑगस्टला पहिली कसोटी खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या मागणीवर अद्याप इंग्लंड बोर्डाकडून उत्तर आलेलं नाही.

७ सप्टेंबरपर्यंत कसोटी मालिका संपावी अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे, जेणेकरुन ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आधी आयपीएल खेळवण्याची संधी मिळेल. सध्याच्या नियोजित वेळेनुसार १४ सप्टेंबरला कसोटी मालिका संपणार आहे.

करोनाने प्रवेश केल्यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलचा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खेळाडूंना करोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल स्थगित होण्याआधी २९ सामने खेळवण्यात आले होते. लीग स्टेज सुरु होण्याआधीच अर्ध्यात आयपीएल स्थगित करण्यात आला.

भारतीय संघ इंग्लंडलमध्ये सहा कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलसोबत होणार आहे. १८ जून रोजी हा सामना खेळला जाईल. यानंतर इंग्लंडसोबत पाच सामन्यांची मालिका असेल. इंग्लंडसाठी प्रवास करण्याआधी भारतीय संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवलं जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.