IPL 2021 : पैसे नसल्याने क्रिकेटचं प्रशिक्षण सोडलं, पण आयपीएलमुळे झाला करोडपती

आयपीएल (IPL) अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमुळे (Indian Premier League) 20-20 हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मोजक्या वेळात थरारक सामने अनुभवण्याची संधी मिळू लागली. आयपीएलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अनेक युवा खेळाडू अगदी थोड्या कालावधीत कोट्याधीश झाले. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे शिवम दुबे (Shivam Dubey).

0

मुंबई : क्रिकेट या खेळाने गेल्या काही दशकांमध्ये कसोटी क्रिकेटपासून, एकदिवसीय सामन्यांपर्यंत आणि तिथून टी-20 सामन्यांपर्यंतचा प्रवास केला आहे. आयपीएल (IPL) अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमुळे (Indian Premier League) 20-20 हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मोजक्या वेळात थरारक सामने अनुभवण्याची संधी मिळू लागली आणि देश-विदेशातल्या खेळाडूंनाही आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ खुलं झालं. देश-विदेशातल्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये केलेली कामगिरी पाहूनच त्यांना त्यांच्या त्यांच्या राष्ट्रीय टीम्समध्ये प्रवेश देण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श (Shaun Marsh), दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (David Miller), भारताचा रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) अशी अनेक खेळाडूंची नावं सांगता येतील. या व्यतिरिक्त आयपीएलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अनेक युवा खेळाडू अगदी थोड्या कालावधीत कोट्याधीश झाले. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे शिवम दुबे (Shivam Dubey). या खेळाडूची इथपर्यंत पोहोचण्याची कहाणी रंजक आहे.

आज आयपीएलमुळे करोडपती झालेला शिवम हा असा खेळाडू आहे, की पूर्वी एकदा त्याच्यावर पैसे नसल्यामुळे क्रिकेटला रामराम ठोकण्याची वेळ आली होती. 2015-16 मध्ये मुंबईत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेमध्ये बडोद्याविरुद्ध त्याने टी-20 मधला आपला पहिला सामना खेळला होता. 2018-19मधल्या एका रणजी सामन्यात बडोद्याविरुद्ध त्याने मुंबईकडून खेळताना एका ओव्हरमध्ये पाच सिक्स ठोकले होते. तसंच, मुंबई लीग 2018मध्येही शिवमने प्रवीण तांबेच्या बॉलिंगवर सलग पाच बॉलवर पाच सिक्स लगावले होते. त्यावेळी या धडाकेबाज खेळीमुळे शिवम चर्चेत आला होता.

शिवम दुबेचा जन्म 26 जून 1993 रोजी मुंबईत झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वडिलांनी शिवमला अंधेरीच्या चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमीत घातलं होतं. तिथे सतीश सामंत यांच्याकडून शिवमने क्रिकेटचे धडे गिरवले. शिवमच्या वडिलांचा डेअरी व्यवसाय होता. नंतर त्यांनी तो व्यवसाय बंद करून जीन्स धुण्याचा व्यवसाय सुरू केला आणि भिवंडीत एक कारखाना सुरू केला. शिवमच्या क्रिकेट प्रशिक्षणामध्ये त्यांचं जातीनिशी लक्ष होतं. त्यातच त्यांचं व्यापाराकडे दुर्लक्ष होऊन नुकसान होऊ लागलं. अखेर, पैशांच्या कमतरतेमुळे शिवमने वयाच्या 14व्या वर्षी क्रिकेटला बाय-बाय केलं.

पण इथेही शिवमला तारलं ते त्याच्या कौशल्यानेच. त्याची या खेळातली प्रतिभा त्याचे काका रमेश दुबे आणि चुलत भाऊ राजीव दुबे यांनी ओळखली होती. ती प्रतिभा केवळ पैशांअभावी वाया जाऊ देता कामा नये, असं त्यांना मनोमन वाटलं आणि त्यांनी शिवमला क्रिकेटसाठी आर्थिक मदत करायचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवम पुन्हा एकदा क्रिकेट खेळू लागला आणि त्यातच करिअर करायचा निश्चय त्याने केला.

शिवमचं कौशल्य आणि फटकेबाजी आयपीएल टीममध्ये निवडणाऱ्यांच्या लक्षात आली नसती तरच नवल. आयपीएलच्या 2019च्या लिलावावेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) शिवमला तब्बल पाच कोटी रुपयांना विकत घेतलं. 2019मध्ये तो आरसीबीकडून पाच सामने खेळला होता.

2021ची आयपीएल 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत शिवम राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून खेळणार आहे. राजस्थानने शिवमला 4.40 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. आता या मोसमात शिवम कशी कामगिरी करतो, याबद्दल क्रिकेट रसिकांना उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.