SRH vs RCB, IPL 2021 Match 6 Result | शाहबाज अहमदची शानदार गोलंदाजी, मॅक्सवेलचे अर्धशतक, बंगळुरुचा सलग दुसरा विजय, हैदराबादवर 6 धावांनी मात

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने

0 0

चेन्नईत रंगलेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायजर्स हैदराबादसमोर आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव केला आणि 6 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला 20 षटकात 8 बाद 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अतिरिक्त दबाव घेत विकेट गमावल्या. शिवाय, बंगळुरूच्या मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, तर हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

हैदराबादचा डाव 

हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिलेच षटक निर्धाव टाकले. दुसऱ्याच षटकात त्याने साहाला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी डाव सांभाळला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये 6 षटकात 1 बाद 50 धावा उभारल्या. त्यानंतर पांडे आणि वॉर्नर यांनी आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 13व्या षटकात वॉर्नरने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर जेमिसनला मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉर्नर बाद झाला.  त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या.

शेवटच्या 4 षटकात 35 धावांची गरज असताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या तीन फलंदाजांना शाहबाज अहमदच्या एकाच षटकात गमावले. बेअरस्टोने 13 तर, पांडे 38 धावा काढून माघारी परतला. समदला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर आलेला विजय शंकरही हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन बाद झाला. राशिद खानने सिराजला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत धावांचे अंतर कमी केले, मात्र, याच षटकात जेसन होल्डर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात हैदराबादला 16 धावांची गरज होती. हर्षल पटेलने टाकलेल्या या षटकात हैदराबादला 9 धावाच घेता आल्या. बंगळुरूकडून अहमदने 2 षटकात 7 धावा देत 3 बळी घेतले. सिराज आणि पटेलला प्रत्येकी 2 बळी मिळाले.

बंगळुरूचा डाव  

बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला तंबूचा मार्ग दाखवला. त्याने 11 धावा केल्या. काही धावांच्या अंतरानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाज अहमदही (14) बाद झाला. त्याला नदीमने राशिद खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. 10 षटकात बंगळुरूने 2 बाद 63 धावा केल्या. संघाला शतकाजवळ नेताना जेसन होल्डरने विराटला बाद केले. विराटे 33 धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला, मात्र, राशिद खानने त्याला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. वॉर्नरकडे झेल देऊन तो एका धावेवर बाद झाला. बंगळुरूने 15व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.

शतकानंतर बंगळुरूने वॉशिंग्टन सुंदर(8) आणि डॅनियल ख्रिश्चन (1) या आपल्या अजून दोन फलंदाजांना गमावले. राशिद खानने सुंदरला झेलबाद केले. मनीष पांडेने सुंदरचा अप्रतिम झेल टिपला. राशिदने आपल्या 4 षटकात फक्त 18 धावा देत 2 बळी घेतले. तर, टी. नटराजनने ख्रिश्चनला यष्टीपाठी झेलबाद केले. दुसऱ्या बाजुला असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मॅक्सवेलने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर, राशिद खानने त्याच्या 4 षटकात 18 धावात देत 2 फलंदाजांना माघारी धाडले.

Leave A Reply

Your email address will not be published.