MI vs KKR : मुंबई इंडियन्सने चेन्नईत उभारली विजयाची गुढी

कोलकाता नाइट रायडर्सचा 10 धावांनी केला पराभव

0 6

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. अचूक रणनितीमुळे कोलकाताने मुंबई इंडियन्सला 20 षटकात 152 धावांवर सर्वबाद केले. रसेलने 18व्या षटकात गोलंदाजीला येत 2 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे कोलकाताने हा सामना गमावला. मुंबईकडून राहुल चहरने 4 बळी घेत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यालाच सामानावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोलकाताचा डाव

मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहर मुंबईसाठी धावून आला. त्याने गिलला वैयक्तिक 33 धावांवर माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चहरने ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही तंबूचा मार्ग दाखवला. दुसऱ्या बाजुला असलेल्या नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला आपली खेळी वाढवता आली नाही. चहरने त्यालाही बाद करत कोलकाताचे संकट वाढवले. राणाने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या.

राणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. अपेक्षित धावा आणि चेंडू यांचे अंतर वाढतच गेले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना तंबुचा मार्ग दाखवला आणि मुंबईने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.

मुंबईचा डाव

मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला संधीचे सोने करता आले नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळले. त्याने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा धारण करत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर मुंबईला आपली धावगती वाढवता आली नाही. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक 43 धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बोल्ड केले.

सूर्यकुमार-रोहितच्या विकेटनंतर कोलकाताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. 18व्या षटकात मॉर्गनने अष्टपलू खेळाडू आंद्रे  रसेलच्या हातात चेंडू सोपवला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. रसेलव्यतिरिक्त पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.