MI VS RR: मुंबई अर्जुन तेंडुलकरला संधी देणार?

मुंबईला मधल्या फळीची चिंता

0 39

पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरण्याऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना आज राजस्थान रॉयल्ससोबत आहे. स्पर्धेत मुंबईनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर राजस्थानची स्थितीही तशीच आहे राजस्थाननं पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत वर येण्याच्या प्रयत्नात आहेत.

मुंबईला मधल्या फळीतील फलंदाजांची चिंता सतावत आहे. क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्ड धावांसाठी झगडत आहेत. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे मधल्या फळीत अष्टपैलू कामगिरी बजावेल अशा खेळाडूला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संधी देण्याची शक्यता आहे. अर्जुन तेंडुलकर वेगवान गोलंदाज आहे. तसेच, वेळप्रसंगी तो विस्फोटक फलंदाजीही करु शकतो. अर्जुन तेंडुलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो. अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या होत्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले होते. त्यामुळे अर्जुनला या सामन्यात संधी मिळते का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे राजस्थानच्या ताफ्यातील विदेशी खेळाडू मायदेशी परतल्याने संघावर दडपण आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियम लिविंगस्टोन आणि अॅड्र्यू टाय यांनी वेगवेगळ्या कारणामुळे संघातून माघार घेतली आहे. राजस्थानला सध्या आघाडीला येणाऱ्या फलंदाजांबाबत संभ्रम आहे. मनन वोहरा आणि यशस्वी जायसवाल मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरलेत. तर शिवम दुबे, डेविड मिलर आणि रियान पराग यांना महत्वपूर्ण योगदान देणं गरजेचं आहे. गोलंदाजीत चेतन सकारिया, जयदेव उनाडकट आणि मुस्ताफिजुर चांगली कामगिरी करत आहेत.

मुंबईनं कोलकाता आणि सनराइजर्स हैदराबादला हरवलं आहे. तर बंगळुरु, दिल्ली आणि पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थाननं दिल्ली आणि कोलकातावर मात केली आहे. तर पंजाब, चेन्नई, बंगळुरुकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आयपीएल गुणतालिकेत मुंबई चौथ्या तर राजस्थान सातव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघातील खेळाडू
मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), अॅडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या, इशान किशन, जेम्स नीशाम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जानसेन, मोहसिन खान, नाथन कोल्टर नाइल, पीयूष चावला, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंह

राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जायसवाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाळ, मयंत मारकंडे, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, कुलदीप यादव, आकाश सिंह

Leave A Reply

Your email address will not be published.