कास पठार-सह्याद्रीनगर मार्ग बंदच राहणार

सातारा : जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेल्या कास पठाराचे नामांकन टिकवण्यासाठी पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कास पठार-सह्याद्रीनगर हा शिवकालीन ...

0 1

सातारा : जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेल्या कास पठाराचे नामांकन टिकवण्यासाठी पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कास पठार-सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग खुला केल्यास या मार्गावरील वनसंपदा धोक्यात येऊन शिकारीचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे हा मार्ग आहे तसा बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कास पठार- सह्याद्रीनगर मार्गावर मानवी वस्ती नाही. आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी पर्यायी डांबरी रस्ते आहेत. कास पठारावरील वनसंपदा टिकली तरच भविष्यात पर्यटन वाढेल. वनसंपदा नष्ट झाल्यास पठाराचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. कास पठाराचा काहीसा भाग पर्यटकांसाठी खुला असून, अनेक हेक्टर परिसर निर्जन आहे. या निर्जन जागेवर वन्यप्राण्यांचा वावर असतो. येथून डांबरी रस्ता गेल्यास वाहनांची वर्दळ वाढणार आहे. परिणामी भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. केवळ विकासाच्या मागे धावलो तर ज्या आल्हाददायक वातावरणासाठी पर्यटक येथे ते वातावरण नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कास पठार- सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग आहे तसाच रहावा, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कास पठार कार्यकारी समिती अध्यक्ष बजरंग कदम यांनी केले.

कासपठार कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले, पठाराच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांचा विकास व्हायला हवा, त्यांना बारमाही रोजगार मिळायला हवा. भूमिपुत्रांना आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने ते व्यावसायिक होत नाहीत. यासाठी जर बँकांनी जाचक अटी न ठेवता काही सौम्य अटींवर पतपुरवठा केला तर या भागात विकास होईल, पर्यटकांची संख्या वाढेल, अनेकांच्या हाताला काम मिळाले. या बैठकीला समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.