अंबाबाईच्या दर्शनावर मर्यादा; तासाला केवळ ४०० भाविकांना परवानगी
राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत.
कोल्हापूर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात तासाला केवळ ४०० भाविकांनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या भाविकांना ऑनलाईन बुकिंगनंतर दर्शन मिळणार आहे.
टाळेबंदी शिथील केल्यापासून अंबाबाई मंदिरात तासाला पंधराशे भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पण राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाबाई आणि जोतिबा मंदिरातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवीन निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं की, मंगळवारपासून या दोन्ही मंदिरात तासाला केवळ ४०० भाविकांनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. मंदिर परिसरातही गर्दी होऊ नये यासाठी काही निर्बंध घालण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही याबाबत माहिती दिली आहे. ‘सकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यान १५ तासात केवळ सहा हजार भाविकांनाच दर्शन घेता येईल. भाविकांनी करोना प्रतिबंधक नियम पाळत दर्शनाचा लाभ घ्यावा,’ असं आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.