LPG gas cylinder price: कमर्शियल गॅस सिलिंडर ४५.५ रुपयांनी स्वस्त, घरगुती गॅस सिलिंडर जैसे थे

LPG gas cylinder price: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ४५.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

0 29

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत ४५.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती वापराच्या १४ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेस एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करतात. पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत.

सिलिंडरचे नवे दर

दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची नवी किंमत १,५९५.५० रुपये आहे. तर मुंबईत नवी किंमत १,५४५ रुपये, कोलकातामध्ये १,६६७.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १,७२६ रुपये आहे. एप्रिल महिन्यापर्यत दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १,६४१ रुपये, कोलकात्यामध्ये १,७१३ रुपये, मुंबईमध्ये १,५९०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १,७७१.५० रुपये इतकी होती.

किंमतीमध्ये असे झाले बदल

एप्रिलमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१४ रुपये इतकी आहे. जानेवारी महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल झाला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात मात्र गॅस सिलिंडरच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली होती. मार्च महिन्यातचही किंमतीतील वाढ सुरूच राहिली होती. एप्रिलमध्ये ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला होता. कारण एप्रिलमध्ये १० रुपयांची किरकोळ कपात झाली होती.

सर्वसामन्यांचे बजेट

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींचा सर्वसामान्य माणसाच्या बजेटवर मोठा परिणाम होत असतो. एलपीजी गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या किंमतीमुळे इतरही अनेक वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होत असतो. त्यामुळेच पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्य माणसाचे लक्ष लागलेले असते. मागील काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर आणि इंधन यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालेली आहे.

कोरोनाचा दणका

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोविड-१९च्या वाढत्या रुग्णांमुळे दैनंदिन कामकाजावरदेखील मोठा परिणाम होतो आहे. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यूमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम एलपीजी गॅस सिलिंडरवर होणार आहे. कोरोनामुळे आता एलपीजी गॅस सिलिंडरसाठी (LPG Gas cylinder) तुम्हाला अधिक काळ वाट पाहावी लागू शकते. एलपीजी गॅस सिलिंडरचा वेटिंग पिरियड वाढणार असून ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर पोचण्यास उशीर होऊ शकतो.

एजन्सीमधील कर्मचारी कोरोनाने बाधित

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे व्यापारी, विक्रेते, एजन्सीतील कर्मचारीदेखील कोरोनाने बाधित झाले आहेत. शिवाय मजूरांच्या आपापल्या गावी निघून जाण्यामुळे देखील गॅस सिलिंडरची डिलिव्हरी वेळेवर होण्यात अडचणी येत आहेत. एजन्सीमधील कर्मचारी आणि वेंडर्समधील वाढत्या कोरोना संसर्गामुळे डिलिव्हरी पिरियड ३ दिवसांनी वाढला आहे आणि आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात कोरोना संसर्ग अधिक असलेल्या भागांमध्ये गॅस सिलिंडरसाठीचा वेटिंग पिरियड ४ ते ५ दिवसांनी वाढण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार सिलिंडर पुरवठ्यात असणाऱ्या २० टक्क्यांपेक्षा अधिक डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.