‘करोनामुक्ती’साठी ग्रामपंचायती सरसावल्या!

0 3

औरंगाबादमधील ४१ गावांची मुक्ततेकडे वाटचाल

 

औरंगाबाद : जिल्ह्य़ातील ४१ ग्रामपंचायतींनी नियमित तपासणी, सॅनिटायझरची फवारणी, लसीकरण, गर्दी टाळण्यासारख्या उपाययोजनांवर भर देत गाव करोनामुक्त करण्यासाठी वाटचाल सुरू ठेवली आहे. यातील ४१ पैकी २६ गावच्या सरपंच या महिला असून अनेक गावे ही तांडा-वाडीसारख्या अल्पलोकवस्तीची असली, तरी काही गावे ही ५ ते २० हजार लोकसंख्येपर्यंतची आहेत.

या ४१ पैकी अनेक गावे दुसऱ्या लाटेतही करोनापासून दूर राहिलेली आहेत. तर अनेक गावांमध्ये एक महिन्यांपासून करोनाचे रुग्ण आढळून येत नाहीत. काही गावांनी सरकारच्या करोनामुक्त गाव मोहिमेअंतर्गत मिळणाऱ्या ५० लाखांचे बक्षीस प्राप्त करण्याचेही ध्येय बाळगून प्रभावीपणे उपाययोजनांवर भर दिलेला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २० गावे ही लहान आकाराची आहेत. तर १४ गावे मोठय़ा लोकसंख्येची आहेत. काही गावे विखुरलेली तर काही सुदूर पसरलेली आहेत. शहापूर, गमुसताळा (ता. फुलंब्री), इटावा, तळपिंप्री हर्सूली (ता. गंगापूर), खामखेडा (औरंगाबाद), रसुलपुरा, कागजीपुरा (खुलताबाद), देवपुरी, सहाणगाव, उंबरखेडा तांडा (कन्नड) व रवळा, वाडी व दस्तपूर (सोयगाव) ही गावे तर दुसऱ्या लाटेतही करोनापासून दूर राहिलेली आहेत.

निंबायतीगाव, निंबायती तांडा, रामपुरा, नावीतांडा, रामपूरवाडी या गावची एक गटग्रामपंचायत आहे. या गावांची मिळून साडेपाच हजार लोकसंख्या आहे. या पाचही गावांमध्ये शिरकाव करण्यासाठी दोन रस्ते असून तेथून करोनाच्या पाश्र्वभूमीवर कोणीही बाहेरचा व्यक्ती प्रवेश करणार नाही, याची काळजी घेतली जाते. ४५ वर्षांवरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लग्नसोहळे बंद केले. होमिओपॅथीची औषधे देणे, नियमित तपासणी, दररोज सॅनिटायझरची फवारणी, यामुळे दीड महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.

– विशाल गिरीसरपंच.

वैजापूर तालुक्यातील शिऊर ग्रा. पं. ची २०११ च्या जनगणनेनुसार १४ हजार लोकसंख्या होती. आता ती १८ ते २० हजारच्या घरात आहे. आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रा. पं. चे कर्मचारी यांच्या मार्फत सोमवार वगळता दररोज तपासणी होते. प्रत्येकाचे मोबाइल फोन नंबर ठेवून त्यांना मार्गदर्शन केले जाते. गावचे स्वतंत्र विलगीकरण केंद्र आहे. त्यात आता दोन-तीन सौम्य लक्षणे असणारे रुग्ण आहेत. करोनामुक्त गावचे ५० लाखांचे बक्षीस प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– राजर्षी जाधवसरपंचशिऊर.

फुलंब्री तालुक्यातील पाल हे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात एकाच दिवशी २५ रुग्ण आढळल्यानंतर खबरदारी घेऊन उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. करोना आटोक्यात आहे. लसीकरणही होत आहे. फवारणी, नियमित तपासणी सुरू असते.

– जया अमोल जाधवसरपंच.

फुलंब्री तालुक्यातील शहापूर, गुमसताळा, पाल, बोरगाव अर्ज, गणोरी, बाबरा, शेलगाव जानेफळ, खामगाव. औरंगाबादमधील पोखरी, भांबरडा, कुंभेफळ, चितेगाव व खामखेडा. गंगापूरमधील आगर कानडगाव, इटावा, तळपिंप्री हर्सूली, पिंपळवाडी खेरगवहाण, देवळी मांजरपूर, मालुंजा (खु.). कन्नडमधील देवपुडी, सहाणगाव, उंबरखेडा तांडा, हतनूर. खुलताबादमधील रसुलपुरा, कागजीपुरा, निरगुडी, झरी, वैजापूरमधील खंडाळा, निमगाव गोंदगाव, लोणी बुद्रुक, शिऊर, या गावांची करोनामुक्त होण्यासाठी वाटचाल सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.