लातूरच्या १०५ वर्षीय आजोबा अन् ९५ वर्षांच्या आजीनं करुन दाखवलं ! ‘तरुण’ दाम्पत्यानं करोनाला हरवलं

करोनाला घाबरणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी

0 17

करोना झाला किंवा करोना हे नाव ऐकूनच सध्या अनेकांना धडकी भरतेय…करोनामुळे दररोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या बातम्या ऐकूनच अनेकजण हॉस्पिटल नको रे बाबा..म्हणत आजार अंगावर काढतायत…करोनाला घाबरणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

लातूर जिल्ह्यातल्या काटगाव-कृष्णातांडा येथील तब्बल 105 वर्षांच्या एका आजोबा व 95 वर्षांच्या आजींनी करोनावर मात केलीये.! हे ‘तरुण’ दाम्पत्य वयानं थकलं असलं तरी त्यांनी करोनाला पिटाळून लावलं आहे.

लातूरपासून जवळपास 30 किमी अंतरावर असलेल्या काटगाव जवळच्या कृष्णा-तांड्यावर राहणारे धेनु चव्हाण यांचं सध्याचं वय 105 वर्षे आहे. त्यांनी करोनासारख्या अनेक साथीच्या आजारांना पाहिलंय…”प्लेगची साथ आली तेव्हा शेतात राहिलो..गाठीचा आजार जवळबी येऊ दिला नाही”, असं ते सांगतात. मात्र गेल्या 25 मार्चला धेनु चव्हाण करोनाने आजारी पडले. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण यांनाही 95 व्या वर्षी करोनाने गाठले. मात्र, या दाम्पत्याने हिंमत हारली नाही.

करोनाशी दोन हात करत धेनु चव्हाण आणि त्यांच्या पत्नी करोनामुक्त झाले आहेत. लातुरच्या सरकारी दवाखान्यात त्यांनी आठ दिवस उपचार घेतले आणि करोनावर मात केली. सध्या त्यांना थोडा अशक्तपणा आहे, पण करोनाचा पराभव केल्याचा त्यांच्या कुटुंबियांना आनंद आहे.

करोनाची लक्षणे दिसताच अनेकजण घाबरून जातात, घाबरल्यानेच आजार जास्त वाढतोय असं म्हणायला वाव आहे. त्यामुळे या 105 आणि 95 वर्षांच्या ‘तरुण’ करोनायोद्ध्यांचा आदर्श घेऊन करोनावर मात करण्याचं बळ सर्वांनी बाळगायला हवं.

Leave A Reply

Your email address will not be published.