तिळाच्या लाडवांनाही ग्राहकांची प्रतीक्षा

मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवणारे तिळाचे लाडू यंदा ग्राहकांच्या मागणीच्या प्रतीक्षेत आहेत.

0

दरवाढ, निर्बंध आणि संसर्गाच्या भीतीने मागणीत घट

मुंबई : मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवणारे तिळाचे लाडू यंदा ग्राहकांच्या मागणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात लागू केलेले कठोर निर्बंध आणि संसर्गाची भीती यामुळे तयार लाडू विकत घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अल्प प्रतिसाद मिळाल्याने लाडू आणि हलवा विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे. ‘तिळगूळ घ्या, गोडगोड बोला’ असे म्हणत तिळाचे लाडू आणि साखरेच्या हलव्याचे वाटप करून  मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवण्यात येतो. धकाधकीच्या जीवनात घरामध्ये लाडू बनविण्यापेक्षा हलवायांच्या दुकानातून तयार लाडू खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे तिळाच्या तयार लाडूंची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. मात्र करोना संसर्गामुळे गेल्या वर्षांपासून या बाजारपेठेवरच संक्रांत आली आहे.

यंदाही तिळाचे लाडू आणि हलव्याने मिठाईच्या दुकानांसह छोटी-मोठी दुकाने सजली असली तरी पूर्वीसारखी विक्री होत नसल्याची खंत या विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  ‘गेल्या वर्षीही प्रतिसादाअभावी बरेच तयार लाडू आणि अन्य साहित्य टाकून द्यावे लागले. यंदा नागरिक बाजारपेठेत येतील या आशेने आम्ही पूर्वतयारी केली होती. परंतु करोना वाढत असल्याने संसर्गाच्या भीतीने नागरिक तयार लाडू घेण्यासाठी धजावत नाहीत. यंदा तिळाचे, गुळाचे दर वाढूनही आम्ही लाडवांच्या किमतीत फारशी वाढ केलेली नाही. येत्या दोन दिवसांत प्रतिसाद वाढण्याची आशा आहे,’ असे दादर परिसरातील लाडू विक्रेत्या लक्ष्मी नागवेकर  म्हणाल्या.  ‘करोनामुळे पदार्थ घरी तयार करण्याकडे कल वाढला आहे. शिवाय मकरसंक्रांतीनिमित्त होणारे सोहळे, महिलांचे समारंभ कमी झाल्याने त्यांच्याकडून येणारी मागणीच बंद झाली,’ असे दत्तकृपा फुड्सचे अनिकेत आपटे यांनी सांगितले.

हळदीकुंकू समारंभांत घट

पूर्वी मकरसंक्राती ते रथसप्तमी या काळात महिलांचे हळदीकुंकू समारंभ मोठय़ा प्रमाणात होत असतात. करोना संसर्गाच्या भीतीने अशा कार्यक्रमांवर मर्यादा घालण्यात  आली आहे. ‘पूर्वी सोसायटी, गृहसंस्था, महिलांचे समूह, कंपन्यांमधील महिला कर्मचारी, शिक्षिका यांच्याकडून मकरसंक्रांतीचे वाण आवर्जून खरेदी करण्यात येत होते. गेल्या दोन वर्षांत त्यासाठीची मागणी ६० टक्क्यांनी घसरली आहे,’ असे बाजारपेठातील विक्रेत्यांनी सांगितले.

दरवाढ 

गतवर्षीच्या तुलनेने तीळ, गूळ, शेंगदाणे, सुके खोबरे अशा जिन्नसाचे दर १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे  तयार लाडूच्या किमतीही वाढल्या आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये गतवर्षी १८० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध असलेले लाडू यंदा २०० रुपयांवर पोहोचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.