मॉल, चित्रपटगृहे सुरू मग कोचिंग क्लासेस बंद का? मानवी साखळीतून क्लासेस चालकांचा सवाल

0 2

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच पेक्षा कमी आल्याने ७ जूनपासून शहरात अनलॉक करण्यात आले आहे. सर्व काही खुले करण्यात आले आहेत. मॉल, चित्रपट गृहे देखील खुली झाली आहेत. सर्व काही सुरू केले आणि ज्ञानदानाचे काम करणारे कोचिंग क्लासेस मात्र बंद का ठेवले? असा प्रश्न कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि.१०) सकाळी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मानवी साखळी तयार करून उपस्थित केला. यावेळी कोचिंग क्लासेस खुली करण्यास  परवानगी द्या अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

कोचिंग क्लासेस गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद आहेत. मागील १६ महिन्यापासून राज्यभरातील कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने संबंधित संचालक, खासगी कोचिंग क्लासेस व शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सकाळी क्रांती चौकात सर्व कोचिंग क्लासेस धारकांनी मानवी साखळी तयार करून कोचिंग क्लासेस असोसिएशनने कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या. अशी मागणी केली.

तसेच क्लासेसच्या वतीने तयार केलेल्या नियमावलीनुसार सोशल डिस्टसिंग, स्यानेटाईझर चा वापर करू, पालकांचे संमती पत्र घेऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. याशिवाय कोचिंग क्लासेस जागा मालकांनी भाडे माफ करण्यासंबंधीत शासनाने त्वरित अध्यादेश काढुन एक वर्षाचे लाईट बिल, जीएसटी व्यवसाय कर, आयकर कर, स्थानिक कर माफ करा, याशिवाय कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना १ एप्रिल पासून ते कोचिंग क्लासेस पूर्ववत सुरू होईपर्यंत कोचिंग क्लासेस संचालकांना प्रतिमाह ४० हजार रुपये व खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना प्रतिमाह २० हजार रुपये मानधन द्यावे.

तसेच सर्व कोचिंग क्लासेस संचालकांना कोचिंग क्लासेस व्यवसायिक म्हणून सरकारी बँकांतून कर्ज देण्याची व्यवस्था करावी. सर्व सुरळीत झाल्यानंतर हप्ते भरण्याची मुभा द्यावी. क्लासेस क्षेत्राचा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना मुद्रा लोण देण्यात यावेत अशा विविध मागण्या कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. पी.एम. वाघ, कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत बनसोड, प्रा. ज्ञानेश्वर ढाकणेसह आदींच्या वतीने करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.