गुणरत्न सदावर्तेंचा सत्कार; नांदेडमधील हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांचे धरणे

0 4

मराठा आरक्षणाचे विरोधक गुणरत्न सदावर्ते यांचा सत्कार केल्याप्रकरणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आज नांदेडमधील सिटी प्राइड हॉटेलसमोर आंदोलन करत हॉटेल मालकाला धारेवर धरले.

 

नांदेड: मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा सत्कार केल्याप्रकरणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नांदेडमधील सिटी प्राइड हॉटेल (City Pride Hotel Nanded) समोर धरणे आंदोलन केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी या मुद्द्यावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षानंही आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी नांदेडमधील हॉटेल सिटी प्राइड इथं मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणाऱ्या सदावर्ते यांचा सत्कार करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आरक्षणाच्या विरोधात गेल्यानं काही लोकांनी सदावर्ते यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रमात सिटी प्राइड हॉटेलचे मालक व्यंकट चारी यांनी सदावर्ते यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. या सत्काराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळं संतापलेल्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सिटी प्राईड हॉटेलसमोर धरणे आंदोलन करत हॉटेल मालकाला धारेवर धरले. हॉटेल मालक व्यंकट चारी यांनी आंदोलकांची जाहीर माफी मागितली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॉटेल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.