शंभर मीटरपर्यंतच वाहनांना टोल; टोलप्लाझावर फास्टॅग अनिवार्य

0 12

सोनगीर (धुळे) : सोनगीर, शिरपूर व लळींग टोलप्लाझावर (Toll Plaza fastag) वाहनांची गर्दी नित्याची असून एक ते दीड किलोमीटर रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होतात. मात्र आता टोलप्लाझापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या वाहनांचेच टोल वसुली करता येणार असून त्यापासून दूर असणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. त्यासाठी शंभर मीटर अंतरावर पिवळी रेष आखणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways authority of india) बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही कारणास्तव १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास पुढील वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: भारतातील सर्वात जुनी रेल्वे गाडीचे ११० व्या वर्षात पदार्पण !

टोलप्लाझावर रांगा न लागता पाच ते दहा सेकंदात वाहन जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. टोलप्लाझावर वाहतूक अखंडपणे सुरू राहण्यासाठी वाहने १०० मीटरपेक्षा जास्त रांगेत राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केले असून फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागतो. फास्टॅगमुळे वाहनचालकांच्या वेळेची बचत होते. मात्र तरीही विविध कारणांसाठी १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी टोल बूथपासून १०० मीटर अंतरावर दोन्ही बाजूला महामार्गावरील ट्रॅकवर पिवळ्या रेषा चिन्हांकित केल्या जाणार आहेत. टोलप्लाझा संचालक व कर्मचारींना तशा सूचना देण्यात आल्या असून आता त्यांना अधिकच क्रियाशील व सावधान राहावे लागणार आहे.

टोलप्लाझा कॅशलेसकडे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे वाहने जलदगतीने रवाना होण्यास मदत होणार असून लवकरच टोलप्लाझावर १०० टक्के कॅशलेस टोल व्यवहार होतील असे स्पष्ट झाले आहे. सोनगीर, शिरपूर, लळींग टोलप्लाझावर ९५ टक्के वाहनांना फास्टॅग असून नियमित वाहतूक करणाऱ्या परिसरातील वाहनांना मासिक पास दिला आहे. अवघे पाच टक्के वाहनधारकांकडे फास्टॅग नाही. त्यामुळे पुर्वीप्रमाणे टोलप्लाझावर रांगा लागत नाही. लवकरच शंभर टक्के वाहनांना फास्टॅग असेल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.
शासनाच्या आदेशानुसार टोलप्लाझाच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रेषा माराव्या लागणार आहेत. मात्र त्यामुळे टोलप्लाझाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालक शंभर मीटरच्या आत पोहोचण्यासाठी गर्दी करतील. त्यामुळे पुन्हा गोंधळ उडेल.

दोन्ही बाजूला महामार्गावर शंभर मीटर अंतरावर पिवळ्या रेषा चिन्हांकित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. आणि म्हणूनच अद्याप टोलप्लाझाने निर्णय घेतला नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.