Marathi school : साडेचारशेवर मराठी शाळांवर संकट

0

नागपूर : राज्य शासनाकडून २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसे झाल्यास जिल्ह्यातील ४४७ मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १५१६ शाळा असून त्यापैकी ४४७ वर शाळांमध्ये २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रम राबविण्यात येते. यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व माध्यान्ह भोजन आदी पुरविण्यात येते. मात्र, यानंतरही जि.प. शाळांची पटसंख्या वाढण्याचे नाव घेत नाही. असलेली पटसंख्याही आता दिवसेंदिवस घटत चालली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी राज्यातील कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता.

शून्य ते वीस पटाच्या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निर्गमित केलेल्या पत्रात केली आहे.

० ते ५ पटाच्या २७ शाळा

जिल्ह्यात ० ते ५ पटसंख्या असलेल्या सुमारे २७ शाळा आहेत. यामध्ये २ पटाच्या २, ३ पट असलेल्या ६ शाळा आहेत. तर ६ ते १० पटाच्या ९२ शाळा आहेत.

केवळ कमी पटसंख्या हा निकष प्रमाण मानल्यास तांडा, वाडी, वस्ती व आदिवासी क्षेत्रातील शाळा बंद होतील. गोरगरीब दलित व बहुजनांच्या बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. कारण इतक्या लहान वयातील गरिबांची मुलं बाहेर शिक्षणाकरीता जाऊ शकत नाही. ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. शाळा बंद करण्याबाबत सुरू असलेली वाटचाल शासनाने त्वरित थांबवावी. अन्यथा शिक्षक समिती याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

-लीलाधार ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर

तालुकानिहाय २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या

तालुका शाळांची संख्या

नागपूर ३३

कामठी १३

हिंगणा ३४

नरखेड ३९

काटोल ५१

कळमेश्वर २५

सावनेर ३९

पारशिवनी २७

रामटेक ३५

मौदा २५

कुही ४६

उमरेड ४७

भिवापूर ३३

Leave A Reply

Your email address will not be published.