रेल्वे मंत्रालयाचा जिगरबाज Mayur Shelke यांना सलाम, 50 हजारांचं बक्षीस जाहीर!

पॉईंटमन मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. आता रेल्वे मंत्रालयाने देखील त्यांच्या या धाडसाची दखल घेत, त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

0 28

मुंबई : सुपरनॅचरल पॉवर्स असलेले सिनेमातील अनेक सुपरहिरो आपल्याला भुरळ पाडत असतात. परंतु आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे सर्वसामान्य असूनही सुपरहिरोपेक्षा कमी नसतात. असाच एक सुपरहिरो म्हणजे पॉईंटमन मयुर शेळके. एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगाने येत असतानाही, मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता रेल्वे मंत्रालयाने देखील त्यांच्या या धाडसाची दखल घेत, त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षांचा एक मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालता चालता तोल जाऊन तो मुलगा ट्रॅकवर पडला. मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवर पडला नेमक्या त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. त्या मुलाची अंध आई आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बावरलेल्या आईला मुलगा नेमका कुठे पडला हेच कळत नव्हतं.

ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून मुलगा कसाबसा उठून प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता. परंतु प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने त्याला काही चढता येत नव्हतं. ही बाब तिथे असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी पाहिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. एक्स्प्रेस काही सेकंदाच्या अंतरावर असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते मुलापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःही वायुवेगाने  प्लॅटफॉर्मवर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार तिथल्या प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.