पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या किरकोळ घटना

राज्यातील ३५ मतदारसंघातील ११ हजार ८६० मतदान केंद्रांवर मतदान पार पडले

0 7

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यात गुरुवारी झालेल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या त्या वगळता सर्वसाधारणपणे मतदान शांततेत पार पडले, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील ३५ मतदारसंघातील ११ हजार ८६० मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मुर्शिदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यातील प्रत्येकी ११, मालदामधील सहा आणि उत्तर कोलकातामधील सात मतदारसंघांत मतदान पार पडले.

मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदान सुरू होण्यापूर्वी गाडीने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले, त्यामुळे या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

गाडीने दिलेल्या धडकेत कादर मोंडल (४२) हा माकप कार्यकर्ता ठार झाला, तर असिम ममनून (४३) आणि लालचंद मोंडल (४२) हे जखमी झाले. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जफिकूल इस्लाम यांनी या तिघांना गाडीने उडविल्याचा आरोप माकपने केला. मात्र जेथे अपघात घडला तेथे जवळपासही आपण नव्हतो, असे स्पष्ट करून इस्लाम यांनी हा आरोप सपशेल फेटाळला.

बीरभूममध्ये भाजप उमेदवार अनिर्बन गांगुलींवर हल्ला

बीरभूम जिल्ह्याच्या इलमबाजार भागात दोन राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यांमध्ये चकमक झडली. या संघर्षात भाजपचे बोलपूरमधील उमेदवार अनिर्बन गांगुली यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यांनी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एकमेकांवर विटा आणि काठ्यांनी हल्ला चढवला. यात किमान दोनजण जखमी झाले, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. आपण बोलपूरमधील मतदान केंद्रांना भेटी देत असताना, तृणमूलचा आशीर्वाद असलेल्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केला व त्यात आपल्या वाहनाचे नुकसान झाले, असा दावा गांगुली यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.