6 वर्षांच्या चिमुरडीची बॅटिंग पाहून हैराण व्हाल, मिताली राजही मदतीसाठी तयार

0 24

भारतामध्ये कायमच क्रिकेट हा सगळ्यात लोकप्रिय खेळ राहिला आहे. या खेळाने नेहमीच लहान मुलांना आकर्षित केलं. नुकताच 6 वर्षांच्या एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी अप्रतिम बॅटिंग करत आहे.

मुंबई, 23 जून : भारतामध्ये कायमच क्रिकेट हा सगळ्यात लोकप्रिय खेळ राहिला आहे. या खेळाने नेहमीच लहान मुलांना आकर्षित केलं. नुकताच 6 वर्षांच्या एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी अप्रतिम बॅटिंग करत आहे. या व्हिडिओवर आनंद महिंद्रा (Anand Mahindra), मिताली राज (Mithali Raj) आणि जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) यांचीही नजर गेली. या सेलिब्रिटींनीही या लहान मुलीचं कौतुक केलं, एवढच नाही तर तिला मदत करण्याचंही आश्वासन दिलं.

या मुलीचं नाव महक फातिमा (Mahak Fatima) आहे. महक केरळच्या कोझीकोडची आहे. सोशल मीडियावर या मुलीच्या बॅटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महक फातिमा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मुलीचे सगळे व्हिडिओ आहेत. महक या व्हिडिओमध्ये नेहमीचा सराव करताना दिसते. याशिवाय तिने पॅड, हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज घालून बॅटिंगही केली.

महकचं कौशल्य तिच्या बॅटिंगमधून दिसतं, कारण तिचे अनेक शॉट्स, स्ट्रेट ड्राईव्ह आणि पूल शॉट बघतच रहावेसे वाटतात. महकच्या या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मिताली राजने तर महकच्या आई-वडिलांना मदतीचं आश्वासनही दिलं. ‘खेळाला पुढे घेऊन जाणाऱ्या मुलींना मी कायमच पाठिंबा आणि आशिर्वाद देते, त्यामुळे महकलाही माझा पाठिंबा तसंच आशिर्वाद आहे. तिला कोणत्याही प्रकारची मदतीची गरज असेल तर तिच्या आई-वडिलांनी मला थेट मेसेज करावा,’ असं मिताली राज म्हणाली आहे.

महक फातिमाने जवळपास 7 महिन्यांआधी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना फातिमाची आई खादीजा म्हणाली, ‘महकने तिच्या वडिलांना विचारलं, की तुम्ही मला मुलगी असल्यामुळे शिकवत नाही का? तेव्हा तिच्या वडिलांना जाणवलं की महकला या खेळात रस आहे.’

तेव्हापासून महक औपचारिक क्रिकेट प्रशिक्षण घेत आहे. फातिमाचे वडील मुनीर यांनी सांगितलं की ते 13 व्या वर्षी कालीकत विश्वविद्यालयातून खेळत होते, तसंच तिच्या भावानेही 18 महिन्यांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

‘फातिमाला आता क्रिकेट एवढं आवडतं की ती दिवसभर वडिलांसोबत घरातही खेळते. भविष्यात क्रिकेटपटू होण्याचं तिचं स्वप्न आहे. स्मृती मंधाना फातिमाची रोल मॉडेल आहे. स्मृतीच्या बॅटिंगचे व्हिडिओही ती बघते,’ असं फातिमाच्या आईने सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.