सोलापूर जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा जास्त पडला पाऊस; पेरणीची टक्केवारी वाढतेय !

यंदा पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद, मका, भुईमूग, मटकीची पेरणी झाली आहे.

0 10

सोलापूर : जून महिन्यात जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची टक्केवारी वाढली आहे. येत्या काळात पाऊस पडला नाही तर पेरलेली पिके करपू शकतात.

जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला. साधारणपणे जून महिन्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप कमी असते. यंदा पाऊस झाल्याने सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद, मका, भुईमूग, मटकीची पेरणी झाली आहे. काही ठिकाणी तूर लावण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात पाऊस न पडल्यास ही पिके सुकू शकतात. दरवर्षी जून-जुलै महिन्यात पाऊस कमी पडत असतो. यावर्षीही सुरुवातीला पाऊस पडला आहे. पुढच्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्याच्या पेरणीचा अंदाज चुकू शकतो.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये) तालुका अपेक्षित पाऊस पडलेला पाऊस

 • उत्तर सोलापूर ८८.९ १०५.८
 • दक्षिण सोलापूर ६९.६ ९०.०
 • बार्शी ८२.३ ११७.८
 • अक्कलकोट ७८.२ ७४.५
 • मोहोळ ६९.८ ८५.३
 • माढा ७४.९ ११६.०
 • करमाळा ७६.१ ७५.८
 • पंढरपूर ७९.८ ८६.५
 • सांगोला ७८.१ ११९.०
 • माळशिरस ८६.६ ६७.८
 • मंगळवेढा ६८.३ १४०.०

नक्षत्र प्रारंभ (कंसात वाहन)

आर्द्रा- २१ जून (कोल्हा), पुनर्वसू- ५ जुलै (उंदीर), पुष्य- १९ जुलै (घोडा), आश्लेषा- २ ऑगस्ट (मोर), मघा- १६ ऑगस्ट (गाढव), पूर्वा- ३० ऑगस्ट (बेडूक), उत्तरा- १३ सप्टेंबर (म्हैस), हस्त- २७ सप्टेंबर (घोडा), चित्रा- १० ऑक्टोबर (मोर), स्वाती- २३ ऑक्टोबर (गाढव).

१ जुलैनंतर पर्जन्यमान कमी असण्याची शक्यता

आर्द्रा नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात चांगला पडणार असून, १ जुलैनंतर पर्जन्यमान कमी राहणार आहे. २६ ते ३० जून या कालावधीत या नक्षत्राचा पाऊस पडणार आहे. पुनर्वसूचा पाऊसही मध्यम असून, १० ते १५ जुलैपर्यंत या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली.

सरासरी २३.६१ टक्के पेरणी

सोलापूर जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र हे २,३४,६४१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ५५,४०५ हेक्टर जागेवर पेरणी झाली आहे. म्हणजेच जिल्ह्यात २३.६१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. यात बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.