MPSC पूर्व परीक्षा: तीन संस्थांमधील परीक्षा केंद्रे बदलली

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात एमपीएससी पूर्व परीक्षा येत्या रविवारी होत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे. मात्र, एमपीएससीने केंद्र बदलण्याचा निर्णय घेतल्याने, आता परीक्षा रविवारी वेळापत्रकानुसार होणार असल्याचे चित्र आहे.

0

 पुणे:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होत आहे. यासाठी पुण्यातील तीन संस्थांमधील होणारी परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत. त्यानुसार उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे एमपीएससीने परिपत्रकाद्वारे सांगितले.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात एमपीएससी पूर्व परीक्षा येत्या रविवारी होत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे. मात्र, एमपीएससीने केंद्र बदलण्याचा निर्णय घेतल्याने, आता परीक्षा रविवारी वेळापत्रकानुसार होणार असल्याचे चित्र आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. हवेलीतील रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. त्याचप्रमाणे अभिनव महाविद्यालय व सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड सायन्स, नऱ्हे या ठिकाणी निश्‍चित केली आहे. याबाबत संबंधित उमेदवारांना नोंदणीकृत क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आल्याचे एमपीएससीने सांगितले. त्याप्रमाणे उमेदवार हॉलतिकीट डाउनलोड करून घेत आहेत. त्यातच शनिवारी व रविवारी पूर्णत: लॉकडाउन असल्याने उमेदवारांना परीक्षेला सामोरे जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, काही उमेदवारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी दुय्यम सेवा परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पत्रकार भवनाजवळ आंदोलन केले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की, तातडीने परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. मात्र, परीक्षा दोन दिवसांवर आल्याने, आता एमपीएससी प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.