युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

भारतातून युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे आहेत.

0

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे. भारतातून युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात काम करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण हे जेमतेम वीस ते तीस टक्के असल्याचे दिसते आहे. तेथील काही विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी २०१५ ते १९ या कालावधीत भारतात घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलेला नाही.

भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या अटीतटीच्या स्पर्धेमुळे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी परदेशाची वाट धरत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. चीन, रशिया युक्रेनमध्ये जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

दरवर्षी १५ ते २० हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकतात. राज्यसभेत दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये यातील बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमांचे आहेत.

 ‘नीटपासून सुटका

भारतातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये तुलनेने सर्वाधिक आव्हानात्मक समजली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) परदेशी जाण्यासाठी द्यावी लागत नाही. युक्रेनमधील विद्यापीठे प्रवेश परीक्षाही घेत नाहीत.

आकडे काय सांगतात?

’युक्रेनमधून डॉक्टर होऊन आलेल्या ६३९० विद्यार्थ्यांनी २०१५ ते २०१८ या कालावधीत परीक्षा दिली. त्यातील साधारण वीस टक्केच म्हणजे १२२४ विद्यार्थीच पात्र ठरले.

’२०१९ मध्ये मात्र परीक्षा देणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी ३७६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

’त्यातील साधारण ३१ टक्के म्हणे ११५९ विद्यार्थी पात्र ठरले. प्रत्यक्ष शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाचा विचार करता भारतात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसते. ’युक्रेनमधील काही विद्यापीठांतील एकही विद्यार्थी भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यास गेल्या चार वर्षांत पात्र ठरलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.