सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील पहिला बोगदा पूर्ण
मंबई :सागरी किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराच्या एका बोगद्याचे खणन काम सोमवारी पूर्ण झाले. या कामाचे यश पालिकेने समारंभपूर्वक साजरे केले. नऊ महिन्यात या बोगद्याचे खणन पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र टाळेबंदीमुळे संथ गतीने झालेले हे काम अखेर एक वर्षांने पूर्ण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गातर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहेत. त्यापैकी मरिन ड्राइव्हकडे जाणारय़ा वाहतुकीसाठी वापरात येणारय़ा पहिल्या बोगद्याचे खणन सोमवारी पूर्ण झाले. गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आला. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला.