‘नागिन ३’ मधील अभिनेता पर्ल वी पुरीला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

नागिन ३ या मालिकेतील अभिनेता पर्ल पुरीच्या विरोधात पोलिस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पर्लला शुक्रवारी, ४ जून रोजी पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलिस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोस्को कायद्या अंतर्गत करण्यात आली आहे.

0 81

हायलाइट्स:

  • टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरीला पोलिसांनी केली अटक
  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेड काढल्याचा आरोप
  • पिडीत मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी पर्ल विरोधात पोलिसांकडे केली तक्रार दाखल

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता पर्ल वी पुरी याला शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणि छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने पर्लवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सदर मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी पर्ल विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पर्ल याला शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. सध्या पर्ल पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, ही मुलगी अल्पवयीन असल्याने पर्लविरोधात पोस्को कायद्यांतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. पिडीत मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे की, पर्लने तिच्यावर गाडीमध्ये बलात्कार केला आणि त्यानंतर अनेकदा त्याने हे कृत्य तिच्यासोबत केले.

करिश्मा तन्नासोबत रिलेशनमध्ये होता

पर्ल त्याच्या नातेसंबंधांवरून कायमच चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी तो करिश्मा तन्नासोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. दोन वर्षे ते रिलेशनमध्ये होते परंतु नंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याने ते वेगळे झाले. परंतु ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

असे घडवले करिअर

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्ल पुरीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी तो कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. काही दिवसांपूर्वी पर्लने एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्याने अभिनयाच्या क्षेत्रात येणे त्याच्या वडिलांना आवडले नव्हते. परंतु त्याला अभिनयाची आवड असल्याने तो घरातून पळून मुंबईला आला. त्याच्या जवळ पैसे नव्हते. पाणीपुरी खाऊन त्याने भूक भागवली होती. एकवेळ तर अशी आली होती की नऊ दिवस त्याने काही खाल्ले नव्हते.

पर्लच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने २०१३ पासून अभिनयाच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ‘दिल की नजर से’ ही त्याची पहिली मालिका होती. नायक म्हणून त्याने पहिल्यांदा ‘फिर भी ना माने बदतमीज दिल’ या मालिकेत काम केले. त्यानंतर पर्लने ‘नागार्जुन एक योद्धा’, ‘बेपनाह प्यार’, ‘नागिन ३’ आणि ‘ब्रह्मराक्षस २’ या मालिकांमध्ये काम केले. पर्लने बिग बॉस १२ आणि १३ कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्याशिवाय ‘किचन चॅम्पियन ५’ आणि ‘खतरा खतरा’ सारख्या रिअॅलिटी कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता. त्याने काही म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.