पटोलेंकडून पक्षबांधणी ऐवजी करोना आढावा बैठकांचा धडाका

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले

0 3

नागपूर : नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून विदर्भापासून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षबांधणी करण्याऐवजी ते करोना केअर सेंटरला भेटी आणि करोना आढावा बैठका घेत आहेत. पटोले यांच्या या उपक्रमांबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले. परंतु  करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांना राज्याचा दौरा करण्याचा संधी मिळाली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. करोनाच्या दुसरी लाट ओसरताचा ते राज्याच्या दौऱ्यावर निघाले. त्याची सुरुवात विदर्भातून केली. पक्षाची सध्याची स्थिती आणि आगामी निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्षांनी पक्षबांधणीवर भर देणे अपेक्षित होते. पण, पटोले यांनी ही संधी गमावली. त्यांनी संपूर्ण दौऱ्यात तालुका, जिल्हा रुग्णालयांना भेटी, करोना केअर सेंटरला भेटी आणि करोना संदर्भात पदाधिकारी यांच्या आढावा बैठकी  घेतल्या. यासाठी त्यांनी संबंधित जिल्ह्य़ातील पालकमंत्र्यांना सोबत घेतले.

प्रदेश अध्यक्षांचा दौरा पक्षबांधणीसाठी असतो. पण, त्यांनी एकाही ठिकाणी मेळावा घेतला नाही. त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याऐवजी मंत्र्याप्रमाणे करोना आढावा बैठकी घेण्यात त्यांची अधिक रुची या संपूर्ण दौऱ्यात दिसून आली.

यासंदर्भात पक्षाने पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अमरावती जिल्ह्य़ातील तिवसा मतदारसंघात पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बुथवरील कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी संघटनात्मक आराखडा एका महिन्यात तयार करा. संपूर्ण राज्यात तिवसा पॅटर्न राबवण्यात येईल, असे यावेळी ते म्हणाले. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून करोना स्थितीचा आढावा घेणे, तिसरी लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

महामारीतून आधी बाहेर पडण्यासाठी लोकांना मदत करण्याचे पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचे आदेश आहे. पक्षाचे महामारीतून प्राण वाचवण्याला प्राधान्य आहे. राजकारण नंतर करता येईल. त्यामुळे करोना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणे आवश्यक होते, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.