नांदेड बाजार समितीला अंधश्रद्धेची ‘भानामती’; अमावस्या असल्याने बीट ठेवले बंद

0 2

नांदेड : पुरोगामी महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगत शाहू- फुले- आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि पुरोगामी महाराष्ट्राचा टेंभा मिरवायचा. तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्रातील लाज जगाच्या वेशीवर टांगायची हा प्रकार तसा नवा राहिला नाही. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने नेमके तेच केले. अमावास्या असल्याने गुरुवारी (ता. दहा) नवा मोंढा येथील ऐन पेरणीत शेतीमालाचे बीट बंद ठेवून अंधश्रद्धेची भानामती असल्याचे दाखवून दिले. अचानक बीट बंद ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

बाजार समितीवरील अंधश्रद्धेचा पगडा उतरण्यासाठी आता कोणता वैदू पुढे येणार हा खरा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. त्यात आता नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची नव्याने भर पडली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा लढला. लोकांमध्ये जनजागृती केली. परंतु त्यांचा विचार नांदेड बाजार समितीपर्यंत अद्यापही पोहोचला नसल्याचे गुरुवारी दिसून आले.

गुरुवार (ता. 10) जून रोजी अमावस्या असल्याने बाजार समितीने शेतीमालाचे नवामोंढातील बीट बंद ठेवण्याचा जणू पराक्रम गाजविला आहे. बुधवार ता. नऊ जून रोजी दुपारी एक वाजून 57 मिनिटाला अमावस्या प्रारंभ झाली. ती गुरुवार 10 जून रोजी सायंकाळी चार वाजून २१ मिनीटाला समाप्त होणार आहे. त्यामुळे अमावस्या असल्याने बीट सुरु ठेवण्यास अपशकुनी ठरते या विचाराने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमालाचे बीट बंद ठेवून आमावस्येचा पगडा असल्याचे दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.