नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यास पाणवेलींचा विळखा
अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदूषण, टायफा वनस्पतीमुळे पक्षी स्थलांतरात अडचणी
नाशिक : जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात थंडीमुळे देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असताना अभयारण्याच्या पाणलोट क्षेत्रात प्रदुषण, पाणवेलीचा विळखा, टायफा वनस्पती यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरात अडचणी येत आहेत. गोदा-कादवा यांच्या संगमावर १९०७-११ या कालावधीत ब्रिटिश शासनाने नांदुरमध्यमेश्वर धरण बांधले. या धरणात ४० वर्षांत गाळ साचत गेल्यामुळे पाणपक्ष्यांना मोठय़ा प्रमाणात खाद्य मिळू लागले. या अभयारण्यात २६० पेक्षा जास्त जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली असून १९८२ मध्ये वल्र्ड वाइल्ड फंड ऑफ़ नेचर या पर्यावरणावर काम करणाऱ्या जागतिक संस्थेने या ठिकाणी प्रथम पक्षीगणना केली होती. त्या वेळी फ्लेिमगो दिसल्याची नोंद आहे. म्हणजे तब्बल २५ ते ३० वर्षांपासून या परिसरात फ्लेिमगोचे वास्तव्य आहे.