इगतपुरी रेव्ह पार्टीनंतर पोलीस आक्रमक, तीन बंगले सील, हीना पांचाळची कोर्टात हजेरी

नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांकडून 3 बंगले सील करुन कारवाई करण्यात आली आहे.

0 13

नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस आणखी आक्रमक झाले आहेत. रेव्ह पार्टीसाठी वापरले गेलेले इगतपुरीतील बंगले पोलिसांनी सील केले आहेत. तर रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेली ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळ (Heennaa Panchaal) हिला कोर्टात हजर केलं जाणार आहे. (Nashik Igatpuri High Profile Rave Party Police seals Bungalow Bigg Boss Marathi Fame Actress Heennaa Panchaal in Court)

नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांकडून 3 बंगले सील करुन कारवाई करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी (शनिवार 26 जून) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली. रेव्ह पार्टी प्रकरणात मॉडेल हीना पांचाळसह सर्व आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे मनोरंजन विश्वासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली.

कोण कोण सापडलं?

पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोण आहे हीना पांचाळ?

अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली डान्सर हीना पांचाळ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे केलेले व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध आहेत. हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही व्हायरल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.