कौशल्य विकास विभागाची जबाबदारी पाहणारे नवाब मलिक यांनी आपले कौशल्य केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी वापरले

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नागपूर : नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर खोटे आरोप करून राज्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल मलिक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५४ अन्वये गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भाजपनेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी झूम-मीटवर आयोजित आभासी पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. त्यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “देशभरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कौशल्य विकास विभागाची जबाबदारी पाहणारे नवाब मलिक यांनी आपले कौशल्य केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी वापरले. महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा होऊ नये यासाठी केंद्र सरकार कंपन्यांवर दबाव आणत असल्याचा खोटा आरोप मलिक यांनी शनिवारी केला होता. मंत्रिपदावर असताना जनतेमध्ये खोटी माहिती पसरविणे हा खरे तर गुन्हा आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने त्यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे.” अशी मुनगंटीवारांनी यावेळी मागणी केली आहे.

तसेच, जनतेची दिशाभूल करण्याच्या गुन्ह्यात एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात राज्य सरकारने हालचाल न केल्यास राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करण्याची विनंती करू, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला केंद्रसरकार कडून परवानगी मिळत नाही. तसेच भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे असल्याच्या आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लगावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.