NSG Commando Beats API औरंगाबाद: NSG कमांडोची पोलिसांना मारहाण; मास्कबाबत विचारणा करताच…

0 10

NSG Commando Beats API: एनएसजी कमांडोने पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. नाकाबंदीदरम्यान हा प्रकार घडला असून गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील नगरनाका चौकात नाकाबंदी सुरू असताना एका वाहनाला थांबविल्यानंतर सदर वाहनामधील युवकाने छावणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांना मारहाण करून जखमी केले. तसेच नाकाबंदीत असलेल्या अन्य पोलिसांनाही मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव गणेश गोपीनाथ भुमे (३४, रा. दिल्ली, ह. मु. फुलंब्री) असे आहे. अधिक तपासात हा तरुण एनएसजी कमांडो असल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. ( NSG Commando Beat Up Police In Aurangabad )

पोलीस निरिक्षक मनोज पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी नगरनाका येथे छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी नाकाबंदीच्या कर्तव्यावर तैनात होते. यावेळी छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग भागिले, जमादार टाक व इतर कर्मचारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरनाका चौकात उपस्थित होते. या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरू होती. एका चारचाकी वाहनातून गणेश भुमे हा विनामास्क जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. तेव्हा या तरुणाने नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत सहायक निरीक्षक भागिले यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला असून, जमादार टाक यांच्या अंगावरील कपडे फाडले गेले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मारहाण प्रकरणात गणेश भुमे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मारहाण करणारा एनएसजी कमांडो

गणेश गोपीनाथ भुमे (३४, रा. दिल्ली, ह.मु. फुलंब्री) याने नगरनाका येथे पोलिसांना मारहाण केली असून अधिक चौकशी गणेश हा लष्करी जवान असल्याची माहिती समोर आली आहे. तो दिल्ली येथे एनएसजी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स येथे कार्यरत असल्याचे समजते. ज्या गाडीतून हा जवान प्रवास करित होता. त्या गाडीवरही एनएसजी कमांडो असे लिहिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.