शेतकऱ्यांना वीज देयक थकबाकीत ५० टक्के माफीची संधी मार्चपर्यंत ; योजनेच्या लाभातून १ लाख ९४ हजार शेतकरी थकबाकीमुक्त

आतापर्यंत चालू वीज देयकांसह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा झाला आहे.

0

पुणे : शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज देयकातून ६६ टक्के सवलत मिळविण्याची संधी मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मार्च २०२२ पर्यंत चालू वीज देयक तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. राज्यात आघाडी घेत पश्चिम महाराष्ट्रात ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असून, त्यापैकी १ लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेत संपूर्ण वीज देयक कोरे केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीज देयकातून थकबाकीमुक्ती, स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण आणि सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. चालू आणि थकीत वीज देयक भरण्यातून ग्रामपंचायती, जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३३ टक्के असा एकूण ७५५ कोटी ८८ लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीज देयकांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चालू वीज देयकांसह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच ४३२ कोटी ३० लाख रुपयांची माफी तसेच मूळ थकबाकीत १६७१ कोटी ३० लाख रुपयांची सूट मिळाली आहे.
महावितरण सध्या आर्थिक संकटात असल्यामुळे ज्यांचा योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही, अशा कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या मार्च २०२२ पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे आणि चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कृषिपंपाच्या मूळ थकबाकीत ६६ टक्के सवलत आणि सुधारित शकबाकीतील ५० टक्के माफीच्या योजनेमध्ये राज्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढतो आहे. त्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांचे मेळावेही घेतले जात आहेत. देयकात तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६१ हजार ८२६ तर सातारा जिल्हा ६० हजार ८२९, पुणे जिल्हा ३३ हजार ८८८, सांगली जिल्हा २७ हजार ७५० आणि सोलापूर जिल्ह्यातील १० हजार ८८ शेतकरी वीज देयकातून थकबाकीमुक्त झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.