मिरज कोविड रुग्णालयात ऑक्सिजन वापर पुन्हा वाढला

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या आठवडाभरात ऑक्सिजनचा वापर दररोज दीड हजार ...

0 4

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून, गेल्या आठवडाभरात ऑक्सिजनचा वापर दररोज दीड हजार लिटरने वाढला आहे. रुग्णालयास दररोज नऊ हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत असली तरी कोल्हापूर व पुण्यातून दररोज ऑक्सिजनपुरवठा सुरळीत सुरू आहे. कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाल्याने गरीब रुग्णांना मिरज सिव्हिलचा मोठा आधार आहे. मिरज कोविड रुग्णालय एप्रिल महिन्यापासून फुल असून, येथे ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. सिव्हिलमध्ये साठ व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागातील शंभर बेडना अखंड ऑक्सिजनपुरवठा आवश्यक आहे. कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर प्रत्येकी सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या तीन ऑक्सिजन टाक्या येथे बसविण्यात आल्या आहेत.

एप्रिलपासून सुरू झालेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने दररोज आठ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू होता. जून महिन्यात रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याने दररोज साडेसात ते दहा हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू होता. मात्र, जूनअखेरपासून ऑक्सिजनचा खप पुन्हा वाढला असून, दररोज नऊ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू आहे.

एप्रिल मे महिन्यांत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने पुरवठा अनियमित होता. आता पुण्या- मुंबईत मागणी कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र, ऑक्सिजन मागणीत पुन्हा वाढ होत असल्याने रुग्णालय प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्याचे कोविड सेंटर असल्याने येथे गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून, व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनचा दुप्पट वापर होतो. अत्यवस्थ कोरोना रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्‌वासासाठी द्रवरूप ऑक्सिजनचा वापर होतो. जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर बंद झाल्याने सर्व रुग्ण मिरज सिव्हिलमध्ये दाखल होत असल्यानेही ऑक्सिजनचा वापर वाढल्याचे चित्र आहे.

नादुरुस्त प्रेशर व्हाॅल्व्ह बदलले महिन्यापूर्वी सिव्हिलच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती सुरू झाल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली होती. ऑक्सिजन प्लांटची तज्ज्ञांकडून तपासणी करून नादुरुस्त प्रेशर व्हाॅल्व्ह बदलण्यात आला आहे. सध्या दरारोज दहा हजार लिटर ऑक्सिजनपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.