झांझरोली बंधाऱ्याची तात्पुरती दुरुस्ती
पालघर तालुक्यातील केळवे रोड (झांझरोली) येथील मातीच्या धरणांमध्ये निर्माण झालेली गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना आखून धरणातील पाणी सोडणाऱ्या विहिरीभोवती माती, खडी, वाळू भरावाचे आवरण दिले आहे.
एप्रिल महिन्यानंतर दुरुस्तीची मोठी कामे
पालघर :पालघर तालुक्यातील केळवे रोड (झांझरोली) येथील मातीच्या धरणांमध्ये निर्माण झालेली गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना आखून धरणातील पाणी सोडणाऱ्या विहिरीभोवती माती, खडी, वाळू भरावाचे आवरण दिले आहे. तसेच धरणाच्या वरील बाजूस ढासळून पडलेल्या पोकळीमध्ये मातीचा भराव करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची पातळी मार्चअखेरीस कमी करून त्यानंतर दुरुस्तीची मोठी कामे हाती घेण्यात येणार आहेत. झांझरोली धरण हे १९८१ मध्ये बांधण्यात आले. मातीच्या या धरणामधून सन १९८३-८४ पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येऊ लागले. झांझरोलीसह १७ गावाला पिण्याच्या पाण्यासाठी ०.४५ दशलक्ष घनमीटर ग्रामीण पाणीपुरवठा योजना सध्या या धरणावरून कार्यरत आहे. सुमारे सात चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असणाऱ्या धरण्यात ३.३९९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा करण्याची क्षमता असून ८४० मीटर लांबी व १७.८० मीटर उंची असणाऱ्या धरणात सध्या २.४६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
पावसाळय़ापासून या धरणातून एका ठिकाणाहून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही गळती वाढल्याने ४ जानेवारी रोजी धरण सुरक्षा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी धरणाची पाहणी करून धरणातील पाण्याची पातळी कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास धरणाच्या वरील बाजूस असलेल्या भरावातील चार मीटर रुंदीचे परिसर ढासळून पोकळी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच धरणातील पाणी पातळी व ढासळलेल्या पोकळीमध्ये असलेल्या पाण्याची पातळी समान असल्याचे दिसून आले.
धरणातील गळतीचे स्रोत हे विहिरीच्या डाऊनस्ट्रीम हेड रेगुलेटर कॉनदुइट (नळ) परिसरातून होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर धरणाखालील चार गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येऊन राष्ट्रीय आपत्ती बचाव कृती दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्याचबरोबर निर्माण झालेली गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेऊन धरणातील विहिरीभोवती तसेच निर्माण झालेल्या पोकळीमध्ये देखील माती भराव टाकण्यात आला आहे. धरणाच्या विमोचकातून पाणी सोडणे जोखमीचे असल्याने धरणाच्या अन्य जागेतून पाणी सोडण्याच्या पर्यायाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या बंधाऱ्यातील गळती रोखण्यात आली असून बंधाऱ्याला स्थैर्य प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. बंधाऱ्याची गळती रोखण्याच्या मदतकार्यात स्थानिकांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
दररोज देखरेख
धरणातील पाण्याची पातळी कमी करून पिण्यासाठी ०.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राखून ठेवून मार्चअखेरी नंतर धरणाच्या गळती संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. धरणाच्या गळतीच्या भागात करण्यात आलेल्या भरावावर सध्या दररोज देखरेख ठेवली जात असून धरणाचा धोका टळल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. धरणाच्या वाढीव सुरक्षिततेबाबत उपाययोजना एप्रिल महिन्यात कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.