“चुकून तुम्ही सत्तेत आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही”, पंकजा मुंडेंची आगपाखड

ओबीसींसाठी राजकीय आरक्षणाची मागणी करण्यासाठी भाजपाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुण्यात पंकजा मुंडेंनी आंदोलनाचं नेतृत्व केलं.

0 12

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्यात विविध ठिकाणी भाजपाकडून आंदोलन सुरू आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळावं, अशी मागणी करत भाजपाचे राज्यातील अनेक मोठे नेते रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत आहेत. पुण्यामध्ये अशाच आंदोलनात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. “५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांखालचं आरक्षणही सरकारनं गमावलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे. राज्यात विविध ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार अशा भाजपाच्या दिग्गज मंडळींकडून आंदोलनात नारे दिले जात आहेत.

सरकारनं १५ महिने फक्त तारखा घेतल्या!

पंकजा मुंडे यांनी यावेळी इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सांगितलं. “या सरकाने १५ महिने फक्त कोर्टाकडून तारखा घेतल्या. इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करण्यास सांगण्यात आलं. पण सरकारने कोणताही डाटा तयार केला नाही. यांनी जाऊन कोर्टात स्वीकारलं की ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय. कोर्टानं त्याच दिवशी आरक्षण रद्द केलं आणि ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

छोटे मन से कोई बडा नहीं होता, और…

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. “अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “देवेंद्रजी म्हणाले तुम्हाला काही जमत नसलं तर आम्हाला सांगा. असंही तुम्हाला काही जमत नाहीये. जेव्हा मी माठाची तिपई बघते, तेव्हा मला आत्ताचं सरकार दिसतं. सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे तिपईचं सरकार आहे. त्यावरच्या मटक्यावर सगळे आंदोलनं गार करणं हे सरकारचं कर्तव्य दिसतंय”, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

मंत्र्यांना हे शोभतं का?

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर देकील टीका केली. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही चक्काजाम जाहीर केला, तर सरकारी पक्ष देखील आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असताना आंदोलनाची भाषा करणं तुम्हाला शोभतं का? मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत, आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे”, असं त्या म्हणाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.