Clubhouse च्या १३ लाख युजर्सचा डेटा झाला लीक? रिपोर्टमध्ये दावा

अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेलं इन्व्हाइट ओन्ली सोशल ऑडिओ अ‍ॅप Clubhouse चा डेटा लीक झाल्याचं वृत्त

0 1
अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेलं इन्व्हाइट ओन्ली सोशल ऑडिओ अ‍ॅप Clubhouse चा डेटा लीक झाल्याचं वृत्त आहे. क्लबहाउसच्या 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख युजर्सचा डेटा लीक झाल्याचा दावा सायबर सिक्युरिटी कंपनी Cyber News ने  एका रिपोर्टमध्ये केला आहे.
सायबर न्यूजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, Clubhouse युजर्सचा SQL डेटा बेस लीक झाला आहे. यामध्ये युजर आयडी, युजर नेम, नाव, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडल यासोबतच फोलोअर्सचीही माहिती आहे. लीक झालेला डेटा ऑनलाइन हॅकर फोरमवरही अपलोड करण्यात आल्याचा दावा सायबर न्यूजने केलाय.  १३ लाख युजर्सचा डेटा लीक झाला आहे. मात्र यात युजरला आर्थिक नुकसान होऊ शकतं असा डेटा नाही असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लीक झालेल्या डेटामध्ये क्रेडिट कार्डबाबत वगैरे माहिती नाहीये, पण जी माहिती लीक झाली आहे त्याद्वारे युजरवर फिशिंग अटॅक होऊ शकतो असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, क्लबहाउसकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
काय आहे Clubhouse :-
क्लबहाउस एक आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. या अ‍ॅप्लिकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऑडिओ अ‍ॅप्लिकेशन आहे. क्लबहाऊसचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप इनव्हाइट बेस आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही ‘रूम’मध्ये सहभागी होऊ शकतात. तिथे बातम्या, डिजिटल मार्केटिंग किंवा अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येते. अगदी शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तुम्ही तिथे तुमचं मतही मांडू शकतात किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे.  हे सामाजिक ऑडियो अ‍ॅप असून भारतात केवळ iPhone युजर्ससाठीच हे उपलब्ध आहे. मात्र आयफोन युजर्सनाही केवळ दुसऱ्या युजरकडून इन्व्हाइट आल्यानंतरच हे अ‍ॅप वापरता येतं. एक युजर फक्त दोन जणांनाच इन्व्हाइट करु शकतो. काही दिवसांपासून या अ‍ॅपबाबत इतकी चर्चा आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनीही हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.