पंतप्रधानांकडून ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा
‘पीएम-श्री’ शाळांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल,
नवी दिल्ली : देशभरातील १४ हजार ५०० शाळांचा ‘मॉडेल स्कूल’ (आदर्श) म्हणून विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या ‘पीएम-श्री’ योजनेची घोषणा केली. या शाळा अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असतील त्यामध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वाचनालये आणि क्रीडांगण यांचाही समावेश असेल. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींकडून या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. ‘प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ’(पीएम-श्री) असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शाळांचा विकास करण्यात येईल. या शाळा नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून काम करतील. पंतप्रधान मोदींनी आज ट्विटरवरून ही घोषणा केली.
मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे स्थित्यंतर झाले असून या ‘पीएम-श्री’ शाळांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींकडून व्यक्त करण्यात आला. केंद्र, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे व्यवस्थापन असलेल्या आणि त्यांच्याकडून निवडण्यात येणाऱ्या शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.
इतर संस्थांना मार्गदर्शन
‘पी-एमश्री’ शाळांमध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०’ मधील सगळ्या घटकांचा समावेश असेल, या शाळा इतरांसाठी उदाहरण असतील. याच शाळा त्यांच्या जवळ असलेल्या इतर शैक्षणिक संस्थांनाही मार्गदर्शन करतील. २१ व्या शतकामध्ये आवश्यक असणारी सगळी कौशल्ये आत्मसात असलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही पंतप्रधानांकडून सांगण्यात आले.