मातला येथील घटना:पोटच्या मुलीवर अत्याचार करुन बापाने पाजले विष; जिवे मारण्याचा होता उद्देश

0 30

पोटच्या सोळा वर्ष मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही निंदनीय घटना तालुक्यातील मातला येथे उघडकीस आली आहे.या प्रकरणी रायपूर पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मातला येथील ४१ वर्षीय नराधम बापाने आपल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर २७ मे च्या सायंकाळी लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी नराधम बापाने तिला जबर मारहाण केली. मुलीने अत्याचाराचा प्रतिकार केला असता बापाने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजले. दरम्यान, मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

या घटनेची माहिती रायपूर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी ३० मे रोजी दुपारी एका पोलिस अधिकाऱ्यांसह सामान्य रुग्णालयात धाव घेत पीडित मुलीची विचारपूस केली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी ३० मे रोजी रात्री नऊ वाजता आरोपी पित्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. दरम्यान, आज आरोपी पित्यास येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रायपूर पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.