पिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावून उद्योजक, कामगारांचे आंदोलन

खड्ड्यांची दुरुुस्ती होते. त्याच ठिकाणी खड्डे होतात, असे सांगून रस्ते दुरुस्तीच्या कामांमधील निकृष्टपणा आंदोलकांनी दाखवून दिला आहे.

0

पिंपरी : भोसरी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक आणि कामगारांनी खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून खड्ड्यांच्या गंभीर समस्यांकडे पिंपरी महापालिकेचे लक्ष वेधले. खड्ड्यांची दुरुुस्ती होते. त्याच ठिकाणी खड्डे होतात, असे सांगून रस्ते दुरुस्तीच्या कामांमधील निकृष्टपणा आंदोलकांनी दाखवून दिला.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. या वेळी खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली. औद्योगिक पट्ट्यात विशेषत: टी ब्लॉक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.

खड्ड्यामुळे कामगारांचे दररोज अपघात घडत आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. उद्योजकांकडून नियमितपणे कर भरण्यात येतो. मात्र आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते, असे भोर यांनी सांगितले.

आवश्यक सुविधा न दिल्यास करभरणा बंद करण्याचे आवाहन उद्योजकांना करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. उद्योजक वैभव जगताप, चंद्रकांत ठक्कर, मतीन शेख, सोनू ओहरी, कल्याण पांचाळ, आकाश बनसोडे, संकेत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.