अभिमानास्पद! ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते, डिसले गुरुजींच्या नावे मिळणार परदेशात स्कॉलरशिप

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
यवतमाळ : महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले तसेच ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्याबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. रणजितसिंह डिसले गुरुजींच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती चालू करण्यात येणार आहे.

शिक्षण प्रसाराविषयी रणजितसिंह डिसले यांची तळमळता लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्लो मझोने-रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने ४०० युरोंची म्हणजेच भारतीय रुपयानुसार ३६ हजार रुपयांची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील १० विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

रणजितसिंह डिसले यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर २०२० मध्ये ग्लोबल टीचर ॲवार्ड जिंकला होता. त्यांना या पुरस्कारामध्ये ७ कोटींची रक्कम मिळाली होती. हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची एवढी मोठी रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली होती. त्यातली अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली. त्यातूनच ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.

दरम्यान, विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून, पुढील १० वर्षे १०० मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.