VIDEO | स्कॉर्पिओच्या बॉनेटवर बसून लग्नाला निघाली, पुण्यात नववधूसह वऱ्हाडींवर गुन्हा

नववधू शुभांगी शांताराम जरांडे (वय 23), कार चालक गणेश शामराव लवांडे (वय 38) आणि व्हिडीओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे (वय 23) आणि स्कॉर्पिओ गाडीमधील इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0 27

पुणे : स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना काढलेला व्हिडीओ नववधूच्या अंगलट आला आहे. 23 वर्षीय तरुणीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी वधूसह कारचालक, व्हिडीओग्राफर आणि गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हवालदार एस. एल. नेवसे यांनी दिलेल्या फिर्याद दिली होती. नववधू शुभांगी शांताराम जरांडे (वय 23), कार चालक गणेश शामराव लवांडे (वय 38) आणि व्हिडीओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे (वय 23) आणि स्कॉर्पिओ गाडीमधील इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभांगी शांताराम जरांडे ही पुण्यातील भोसरी परिसरात सहकार कॉलनीमध्ये राहते.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (13 जुलै) शुभांगीचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जाताना उत्साहाच्या भरात ती दिवे घाटातून चक्क कारच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत होती. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ते तिथे पोहोचले. त्यावेळी शुभांगी (एमएच 12 बीपी 4678) कारच्या बोनेटवर बसली होती. तर इतर वऱ्हाडी गाडीत बसले होते.

गणेश लवांडे कार चालवत होता, तर गाडीसमोर बाईकवर बसून (एमएच 14 बीजी 5259) तुकाराम शेडगे हा व्हिडीओ शूटिंग करत होता. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला आहे. नववधू, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.