पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्द

करोनाच्या पहिल्या लाटेतील शिथिलतेनंतर रेल्वेने गाडी गाड्या सुरू केल्या होत्या.

0 4

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेससह आता १४ मेपासून डेक्कन क्वीनही रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी आता स्वतंत्र गाडी नसल्याने दोन्ही शहरांच्या  मार्गे धावणाऱ्या बाहेरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचाच पर्याय शिल्लक राहिला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेतील शिथिलतेनंतर रेल्वेने गाडी गाड्या सुरू केल्या होत्या. त्यात पुणे-मुंबई दरम्यानची इंद्रायणी एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्यांचा समावेश होता. मात्र, सुरुवातीपासून या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. करोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यानंतर या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळू लागला. गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर घटले. त्यामुळे प्रवाशांअभावी गेल्या महिन्यापासून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी जूनअखेरपर्यंत धावणार नाही. त्यापाठोपाठ आता पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी १४ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

डेक्कन क्वीनसह कोल्हापूर-मुंबई ही गाडीही १८ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. यापूर्वीही प्रवाशांची मागणी नसल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-बिदर, मुंबई-लातूर, पुण्याहून प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सोडण्यात येणारी पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे-फलटण, लोणंद-फलटण या मार्गावरील डेमू रेल्वेचा समावेश आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी आता स्वतंत्र गाडी नाही. मात्र, दक्षिणेकडून पुणेमार्गे मुंबईकर्डे किंवा गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.