पंजाब: मोजे विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉल, परत जाणार शाळेत

0 4

करोनाचं संकट डोक्यावर घोंघावत असताना अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंब आपलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी कामाच्या शोधात आहे. तर काही जण हाताला मिळेल ते काम करत आहेत. नुकताच पंजाबमधील लुधियानात एक १० वर्षांचा मुलगा रस्त्यावर मोजे विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत बाहेर काढण्यासाठी हा मुलगा रस्त्यावर मोजे विकत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी या १० वर्षांच्या मुलाला मदतीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करत व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतक्या वेगाने पसरला की, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनाही दखल घ्यावी लागली. अमरिंदर सिंग यांनी मुलाला व्हिडिओ कॉल करत मदतीचं आश्वासन दिलं आहे.

दहा वर्षाच्या वंश सिंगनं शाळेला सोडचिठ्ठी देत कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने रस्त्यावर मोजे विकण्यास सुरुवात केली.या मुलाला मोजे विकताना पाहिल्यानंतर एका प्रवाशाला भावना आवरता आल्या नाहीत. त्याने व्हिडिओ चित्रित करत त्याला प्रश्न विचारले. आपल्या घराची परिस्थिती बेताची असून शाळा सोडल्याचं त्याने सांगितलं. तसेच कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी मोजे विकत असल्याचं सांगितलं. यावेळी त्या प्रवाशाने त्याला ५० रुपये देण्याचा प्रयत्न केला. मात्र मेहनती वंशने ते घेण्यास नकार दिला. हा व्हिडिओ प्रवाशाने त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर इतक्या वेगाने पसरला की, खुद्द मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधला आणि मदतीचं आश्वासन दिलं. तसेच शाळेत दाखल करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले.

 

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी वंशच्या कुटुंबियांना २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर वंशच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल असंही जाहीर केलं आहे.

वंशचे वडीलही रस्त्यावर मोजे विकतात आणि आई घरकाम करते. वंशला तीन बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. त्याचं कुटुंब भाड्याच्या खोलीत हैबोवाल येथे राहाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.