Remdesivir स्वस्त झालं पण…; औषधाबाबत AIIMS ने दिली मोठी माहिती

काही दिवसांपूर्वीच रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.

0 5

मुंबई, 19 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर (Remdesivir) औषध चांगलंच चर्चेत आहे. या औषधाची वाढती मागणी, निर्माण झालेला तुटवडा आणि काळाबाजार अशा बऱ्याच बातम्या कानावर आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने याची दखल घेत या औषधाची निर्यात थांबवली आणि देशांतर्गत औषध उत्पादन वाढवण्याचाही निर्णय घेतला. तसंच या औषधांच्या किमतीही लक्षणीयरित्या कमी केल्या. रेमडेसिवीर औषध स्वस्त झालं आहे पण आता या औषधाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

ज्या रेमडेसिवीर औषधासाठी लोकांची झुंबड उडाली ते औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी फारसं फायदेशीर नाही, असं दिल्लीतील एम्सचे AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी ANI शी बोलताना सांगितलं

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “एक वर्ष आम्ही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अनेक औषधांचा वापर करून पाहिला. यातून आम्हाला खूप काही समजलं. रेमडेसिवीर औषध हे मॅझिक बुलेट नाही. या औषधामुळे मृत्यूदर कमी होत नाही. लक्षणं नसलेल्या रुग्णांना किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध दिल्याने काही फायदा होत नाही. फक्त रुग्णालयात दाखल असलेल्या आणि मध्यम स्वरूपातील लक्षणं असलेल्या  रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त आहे. पण हे औषध उशिरा दिल्यानेही काही फायदा होत नाही. या औषधाचा वापर मर्यादितच आहेत. प्लाझ्मासुद्धा फार उपयोगाचं नाही. प्लाझ्माचाही खूप मर्यादित वापर आहे”

“बहुतेक कोरोना रुग्ण हे त्यांच्यातील लक्षणांनुसार केलेल्या उपचारामुळेतच बरे होत आहेत. गरज नसताना औषधं दिल्याने फायदा होण्यापेक्षा दुष्परिणाम जास्त होईल”, असं गुलेरिया म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच रेमडेसिवीर औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने देशात रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या प्रमुख औषध कंपन्यांशी चर्चा केली. त्यानंतर अशा सात कंपन्यांनी आपल्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. या औषधाच्या 100 Mg एका कुपीची किंमत आता 3500 रुपयांपेक्षा खाली आहे. प्रत्येक कंपनीच्या औषधाचे दर वेगवेगळे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.