Right To Education : सात दिवसात १७०० प्रवेशाचे आव्हान

0 4

बुलडाणा : आरटीई अंतर्गंत बालकांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. लाॅटरी पद्धतीने निवड झालेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली आहे. तसेच ४०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. आता ७ दिवसात १७०० प्रवेशांचे आव्हान शिक्षण विभागासमाेर आहे. आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी राज्यभरात ७ एप्रिल राेजी पहिली लाॅटरी काढण्यात आली हाेती; मात्र काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रवेश प्रक्रीया लांबवणीवर टाकण्यात आली हाेती. त्यानंतर ११ जून पासून प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत १२ दिवसात केवळ १०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. यावर्षी आरटीईसाठी जिल्हाभरातील २३१ शाळांनी नाेंदणी केली हाेती. जिल्ह्यात २ हजार १४२ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रीया राबवण्यात आली आहे.

या जागांसाठी जिल्हाभरातून ३ हजार ४४५ पालकांनी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी लाॅटरी पद्धतीने पहिल्या फेरीत १ हजार ८७९ बालकांची निवड झाली आहे. ११ जून पासून प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली असून २३ जून पर्यंत केवळ १०५ बालकांनी प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली आहे. तसेच ४०३ बालकांच्या पालकांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रवेश प्रक्रीया रखडली हाेती. काेराेना संसर्ग कमी झाल्याने आता अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यानंतर आरटीई अंतर्गंत प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

११ जून पासून प्रवेश प्रक्रीयेस प्रारंभ करण्यात आला असून ३० जूनपर्यंत शाळा स्तरावर प्रवेश घ्यावा लागणार आहे. निवड झालेल्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावे. तसेच प्रवेशावेळी गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीई प्रवेशासाठी समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. या समित्या तक्रारी साेडवणार आहेत.

आरटीई अंतर्गंत लाॅटरी पद्धतीने १ हजार ८७९ बालकांची निवड झाली आहे. ३० जूनपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. समितीस्तरावर कागदपत्रे पडताळणी सुरू असल्याने विहीत मुदतीत पहिल्या टप्यात निवड झालेल्या सर्व बालकांचे प्रवेश हाेतील, अशी अपेक्षा आहे. ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांनी प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.