ठाण्यातील लोकमान्यनगर भागात दुसऱ्यांदा रस्ता खचला

रस्त्याखालील मातीचे परीक्षण करण्याचा पालिकेचा निर्णय

0 6

रस्त्याखालील मातीचे परीक्षण करण्याचा पालिकेचा निर्णय

ठाणे : लोकमान्यनगर भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा रस्ता गुरुवारी रात्री पुन्हा खचला आहे. या मार्गावरील वाहतूक इंदिरानगरमार्गे वळविण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांत हा रस्ता दुसऱ्यांदा खचल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून यांमुळे या रस्त्याखालील मातीचे परीक्षण करण्याचा निर्णय पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.

लोकमान्यनगर भागातील डवलेनगर ते यशोधननगर हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून टीएमटी बसगाडय़ांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता गुरुवारी रात्री खचला आणि त्याठिकाणी ७ ते ८ फूट खोल खड्डा पडला. वाहन खड्डय़ात पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून स्थानिकांनी या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि याठिकाणी मार्गरोधक उभारून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. शुक्रवारी सकाळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी याठिकाणी पाहणी दौरा केला. दोनदा हा रस्ता खचल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाने तातडीची बैठक बोलाविली होती.  या संदर्भात शहर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याखालून गेलेल्या पाणी आणि मलवाहिन्यांमधून गळती होऊन हा रस्ता खचत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे रस्त्याखालील मातीचे परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता यूटीडब्ल्यूटीचा करण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, परंतु वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होत नसल्यामुळे वाहतूक शाखेकडून त्यास परवानगी मिळत नव्हती, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक इंदिरानगर मार्गे 

लोकमान्यनगर टीएमटी आगारातून वृंदावन, खारेगाव, मीरा रोड आणि मुलुंडच्या दिशेने बसगाडय़ांची वाहतूक सुरू असते. या बसगाडय़ा डवलेनगर ते यशोधननगर या मार्गे वाहतूक करतात. दर पंधरा मिनिटाने एक बसगाडी या मार्गावरून जाते. तसेच या मार्गावरून शेअर रिक्षा आणि परिसरातील नागरिकांच्या वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. हा रस्ता खचल्याने टीएमटीची वाहतूक आता इंदिरानगर मार्गे वळविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.