आरटीई प्रवेशासाठी राज्यात २ लाखांवर अर्ज

आरटीई प्रवेशासाठी राज्यात २ लाखांवर अर्ज

0

नागपूर : शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून राज्यात १ लाख २ हजार जागांसाठी २ लाख ३० हजार ४९२ पालकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक ५० हजारावर अर्ज पुण्यात तर त्यापाठोपाठ नागपुरात २८ हजारावर अर्ज करण्यात आले आहेत.

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया १६ फेब्रुवारीला सुरू झाली होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही शाळांची नोंदणीच पूर्ण न झाल्याने प्रवेश प्रक्रिया २३ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान सुरू झाली. यामुळे पालकांना अर्ज करण्यासाठी केवळ चार दिवसांचाच कालावधी मिळाला. ‘आरटीई’च्या कायद्यानुसार पालकांना अर्ज करण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शाळांची नोंदणीच झाली नसल्याने पालकांना हा कालावधी मिळत नव्हता. आता अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात ‘आरटीई’ अंतर्गत ९ हजार ८७ शाळांचा समावेश असून १ लाख २ हजार जागांची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी पाच मार्चपर्यंत २ लाख ३० हजारांवर अर्ज आले आहेत. म्हणजे उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी चांगलीच तारांबळ उडणार आहे. याशिवाय प्रवेश अर्जासाठी आणखी पाच दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे अर्जांचा आकडा तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवसाला पंधरा हजार अर्ज

शाळाही ऑनलाइन असल्याने अनेक पालकांनी नव्याने प्रवेशच घेतले नाही. मात्र, यंदा आरटीई प्रवेशासाठी दिवसागणिक पंधरा हजार अर्ज प्राप्त होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. गेल्या वर्षी सुमारे दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते. आता पुन्हा पाच दिवस अर्ज करण्याची मुदत असल्याने या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.