युक्रेन ते देऊळगावराजा व्हाया रोमानिया जयेशचा थरारक प्रवास
देऊळगावराजा : रशिया ने युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर युक्रेन देशाची परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या देऊळगावराजा येथील जयेश मंडल नुकताच सुखरूप घरी पोचला.
देऊळगावराजा : रशिया ने युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर युक्रेन देशाची परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या देऊळगावराजा येथील जयेश मंडल नुकताच सुखरूप घरी पोचला. शैक्षणिक जीवनात कधीही साधं तंटा ही अनुभवला नसताना मिझाईल टँक, बँकर, बॉम्बिंगच्या कर्कश व क्लेशदाई आवाज अशा युद्धाच्या परिस्थितीतून स्वतःचा जीव वाचवून घरापर्यंत सुखरूप पोहोचलेल्या जयेश याने खडतर अनुभव कथन केला. युद्धजन्य युक्रेन ते देऊळगाव राजा व्हाया रोमानिया अंगावर शहारे आणणारा एक निरंतर अनुभव सांगताना कुटुंब ही भावुक झाले.
युक्रेनमधील बिनदशीया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता. चौथ्या वर्षीचे शिक्षण घेत असताना रशियाने युक्रेनच्या विरुद्ध युद्ध पुकारले अन् जयेश मंडल याच्यासह वैद्यकीय शिक्षण घेणार्या असंख्य विद्यार्थ्यांना आपल्या मायभूमीत परतण्याची ओढ लागली. युक्रेन ते देऊळगाव राजाचा त्याचा प्रवास अंगावर रोमांच उभे करणारा आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडताना अनंत अडचणींचा सामना करत जयेश कालिपद मंडल हा वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी २६ फेब्रुवारीला रोमानियाच्या सीमेवर पोहोचला. त्या तणावग्रस्त भागात १५ किलोमीटर अंतर असताना तेथील सरकारच्या बसेसने त्यांना सोडून दिले. पाठीवर २० किलो सामानाची बॅग घेऊन तो व त्याच्यासोबतच्या विद्यार्थ्यासह १५ किलोमीटरचे अंतर पायी रोमानिया बॉर्डरपर्यंत पोहोचले. बॉर्डरवर भारत सरकारच्या मिशन गंगाच्या साहाय्याने ते रोमानियाच्या बुचारेस्ट शहरातील ओटोपेनी या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. मुंबई ते औरंगाबाद विमानतळावर पोचल्यावर संकटात सापडलेल्या आपल्या मुलाच्या भेटीसाठी आलेल्या आई वडिलांना गहिवरून आले.
युक्रेनची राजधानी कीव्ह येथे त्याचा इंदौर येथील मित्र वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याला माहिती विचारली. त्याने रात्री बॉम्बगोळे फेकले गेल्याचे आणि रात्रभर आकाशात रॉकेट फिरत असल्याचे सांगितले. त्या दिवशी बिनदशीया शहरात खाद्यपदार्थ घेण्यासाठी निघाला असता संपूर्ण मार्केट माणसांनी गच्च भरून गेले होते. खाद्यपदार्थ मिळणे सुद्धा मुश्किल झाले होते. जे भेटेल ते खाद्यपदार्थ घेऊन त्याने होस्टेल गाठले. आता भारतीय दूतावास काय मेसेज देते याकडे लक्ष दिले तर २५ फेब्रुवारीच्या रात्री होस्टेल मॅनेजमेंटने सर्व विद्यार्थ्यांना तळघरातील बंकरमध्ये सुरक्षित ठेवले. २६ फेब्रुवारीला जाहीर केले की विद्यार्थी आपापल्या देशात जाऊ शकतात. ही बातमी धीर देणारी होती. १ मार्च सायंकाळी मुंबई विमानतळावर विमान लँड झाले. ही आनंदाची बातमी जयेशने आपल्या आई-वडिलांना दिली व आई-वडिलांनी लगेच औरंगाबाद विमानतळ गाठले. परदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर अनेक अडचणीतून वाट काढत मायदेशी परतलेल्या आपल्या मुलाला पाहून दोघांचे अश्रू अनावर झाले. घरी आल्यावर वैद्यकीय, फार्मसीसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंडल कुटुंबाची भेट घेऊन जयेशचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश सवडे, सुनिता सवडे यांनी युक्रेन येथून सुखरूप घरी वसलेल्या जयश मंडल याचे पुष्पहार घालून स्वागत केले.
९ पैकी ६ विद्यार्थी मायभूमीत दाखल
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी मायभूमीत मिशन गंगा अंतर्गत दाखल झाले आहे. यात अमृता सोनुने, जयेश मंडल, कुणाल व्यास तर, ३ मार्चला सकाळी १०.३० वाजता दिल्ली येथे देऊळगावराजाचा नित्कर्ष सानप, चिखलीची अलमास फातिमा, मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील अवंतिका खरसने यांचे आगमन झाले आहे.